मुंबई : ‘विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये आणि नवे मोडी अभ्यासक घडविण्यासाठी मोडीदर्पण दिवाळी अंक महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असे प्रशंसोद्गार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोडीदर्पण दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी काढले.
मोडी लिपीच्या प्रचारार्थ सुरू करण्यात आलेल्या ‘मोडीदर्पण’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ‘मोडीदर्पण’चे संपादक सुभाष लाड, कार्यकारी संपादक विजय हटकर, सहसंपादक स्नेहल आयरे, आशा तेलंगे, विराज चव्हाण, गणेश चव्हाण, उद्योजिका उल्का विश्वासराव, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, सल्लागार शांताराम पाटकर, जासई -उरणचे मंडळ अधिकारी संदीप भंडारे, विस्तार अधिकारी विजय बाराथे, दीपक मढवी, विराज मढवी, पंकज लाड, तुषार आयरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दर वर्षी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक ही मराठी साहित्याची खूप समृद्ध परंपरा आहे. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अंक प्रकाशित होऊ शकले नाहीत; मात्र मुंबईच्या मोडी लिपी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मोडीदर्पण हा दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. शिवकाळात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मोडी लिपीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, तसेच मोडी लिपीविषयी उत्सुकता निर्माण होऊन नव्या पिढीची पावले मोडी लिपीच्या अध्ययनाकडे वळावीत, या हेतूने हा अंक प्रकाशित करण्यात आला आहे.
प्रकाशनानंतर बोलताना उदय सामंत म्हणाले, ‘सध्या राज्यात मोडी लिपीचे जाणकार आणि अभ्यासकांची कमतरता आहे. शासनदप्तरी असलेल्या मोडी कागदपत्रांचे वाचन करताना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर मोडीविषयी उत्सुकता निर्माण करण्यासाठी मोडीदर्पण दिवाळी अंक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मोडी वाचणाऱ्या व शिकू इच्छिणाऱ्या तरुणाईला या अंकामुळे नवी दिशा मिळणार आहे.’
मोडी लिपीच्या संवर्धनासाठी राज्य सरकार मोडी लिपी मित्रमंडळाला सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शिवकाळात समृद्ध असलेल्या मोडी लिपीचा वैभवशाली इतिहास अंकाचे संपादक सुभाष लाड यांनी उपस्थितांसमोर उभा केला. मोडी लिपीच्या प्रचारासाठी आगामी काळात राज्यस्तरीय मोडी लिपी संमेलन घेण्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच राज्य सरकारने या कामी सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी सामंत यांना केली.

मोडीदर्पण दिवाळी अंकाचे अंतरंग
मोडीदर्पण दिवाळी अंकामध्ये मोडी लिपीची प्राथमिक ओळख, मोडीसह खरोष्ठी, ब्राह्मी या भारतातील प्राचीन लिपींचा इतिहास सांगणारे लेख आहेत. हे लेख डॉ. मंजिरी भालेराव, सुनील कदम, रणजित हिर्लेकर या अभ्यासकांचे आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते नारायण जाधव, वृंदा कांबळी, गजानन वाघदरे, डॉ. केदार फाळके, सुधीर रिसबूड, मराठी शुभेच्छापत्रांचे जनक प्रसाद कुलकर्णी, गोविंद नाईक, नव्या पिढीचा कवी गीतेश शिंदे, पर्यावरणतज्ज्ञ प्रिया फुलंब्रीकर, पुरुषोत्तम रानडे, पंकज भोसले यांच्या वैचारिक, कथा, कविता आणि ललित लेखनाने हा संग्राह्य अंक सजला आहे. याशिवाय समृद्ध कोकण विशेष लेखमालाही यात असून, समाजभान जपणाऱ्या करोना योद्ध्यांची ओळखही विशेष लेखांमधून करून देण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी संपादक विजय हटकर यांनी दिली. एक हजार अंकांची प्रकाशनपूर्व नोंदणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. स्नेहल आयरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संपर्क : ८८०६६ ३५०१७

