रत्नागिरी : खेडशी नाका (ता. रत्नागिरी) येथील तरुणांनी दिवाळीच्या निमित्ताने रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्याची मोठी प्रतिकृती साकारली आहे. येत्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली राहणार आहे.
खेडशी नाका येथील शिवशक्ती ग्रुपने सलग पाचव्या वर्षी दिवाळीनिमित्ताने किल्ल्याची प्रतिकृती साकारायचे ठरविले. या वर्षी करोनाचे संकट असल्याने किल्ला साकारायचा की नाही, असा विचार सुरू होताच; मात्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकत्र झाले. त्यामध्ये निखिल होरंबे, अथर्व व्हरे, साहिल गावडे, नील कुळ्ये, चैतन्य सावंत, अथर्व होरंबे, कार्तिक होरंबे, हर्षद माईन, ऋतिक होरंबे, ओमकार होरंबे, स्वरूप पालेकर, रविकांत इन्डिगिरी, उमेश होरंबे, सुशांत भातडे, सर्वेश होरंबे यांचा समावेश होता. या साऱ्यांनी करोनाविषयीचे सर्व निर्बंध आणि नियम पाळून प्रतिकृती साकारायची, असे ठरविले.
त्या वेळी झालेल्या चर्चेनुसार रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारायचे एकमताने ठरविण्यात आले. त्यानुसार २५ फूट लांब, १५ फूट रुंद आणि चार फूट उंचीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ती साकारायला सुमारे २० दिवस लागले. संपूर्ण किल्ला पर्यावरणपूरक पद्धतीने बांधण्यात आला आहे. त्यामध्ये माती, चिरा, दगड, बारदान यांचा वापर करण्यात आला आहे. हा किल्ला साकारताना स्थानिक किल्लाप्रेमी मंडळी, तसेच जे. डी. डेकोरेटर्स, न्यू राज साउंड आणि मंडप डेकोरेटर्स (पुणेकर मित्र परिवार) यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
ही प्रतिकृती नागरिकांना पाहण्यासाठी खुली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत ती पाहता येईल. प्रदर्शन पाहताना करोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क लावणाऱ्यांनाच प्रदर्शन पाहायला परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी ऋतिक होरंबे (९०७५८४०५५२), ओमकार होरंबे (८९७५२६४१०२) किंवा स्वरूप पालेकर (८३७९०१११४७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media