वाढीव वीजबिलमाफीसाठी २३ नोव्हेंबरला रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे आंदोलन

रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात महावितरणकडून देण्यात आलेल्या अवास्तव वाढीव वीजबिलांविरोधात २३ नोव्हेंबर रोजी भाजपच्या दक्षिण रत्नागिरी विभागातर्फे चार तालुक्यांमध्ये आंदोलन करून निषेध नोंदवण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजव्यापी आंदोलन केले जाणार आहे. त्या आंदोलनाचाच हा एक भाग आहे.

अवास्तव वीजबिल आकारणीसंदर्भात महावितरणच्या विरोधात जनतेचा आक्रोश शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यासाठी, राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व वीजबिले माफ व्हावीत यासाठी २३ नोव्हेंबरला रत्नागिरीत सकाळी ११ वाजता नाचणे रोड येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिली. यामध्ये भाजप पदाधिकारी, नगरसेवक, युवा मोर्चा, महिला मोर्चा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. रत्नागिरीसह लांजा, संगमेश्‍वर व राजापूर या तालुक्यांमध्ये भाजप तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.

लॉकडाउनच्या कालावधीतील बिले माफ झाली पाहिजेत, अशी भाजपची आग्रही भूमिका आहे. यापुढे अशी वाढीव वीजबिले येऊ नयेत व शेतकरी वापराची वीजबिले पूर्णपणे माफ करावीत, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. महावितरणच्या, पर्यायाने राज्य शासनाच्या अन्याय्य धोरणाचा निषेध करत बिले फाडून टाकून निषेध नोंदवण्यात येणार आहे. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजबिल माफीसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.

रत्नागिरीतील बहुतांशी वीजग्राहकांनी आलेली बिले भरणा करून अडचणीच्या कालावधीतही सहकार्याची भूमिका घेतली होती; मात्र राज्य शासनाने वीजबिल माफीचा शब्द पाळला नाही. शासनाची ही कृती जनतेची घोर निराशा करणारी व दिशाभूल करून जनतेला वेठीस धरणारी आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणाचा धिक्कार करण्यात येणार आहे. जनभावनेचा विचार करून वीजबिलाचा अतिरिक्त बोजा दूर करण्यासाठी शासन नकारात्मक असल्यामुळे शासनाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. ग्राहकांनी या आंदोलनात सहभागी होऊन आवाज बुलंद करावा, असे आवाहन सचिन करमरकर यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply