करोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ‘महाराष्ट्राने करोनाची रुग्णसंख्यावाढ रोखली असली, तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. मला पुन्हा कोणताही लॉकडाउन करायचा नाही; पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ नोव्हेंबर) केले. ते समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

वारकऱ्यांना आवाहन
‘मला राजकारण करायचे नाही; पण करोना वाढला, तर ‘हे उघडा ते उघडा’वाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का,’ असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळेदेखील उघडली आहेत; पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. चार दिवसांनी मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही आपण गेल्या काही महिन्यांपासून कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत. आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छटपूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते, तसे कार्तिकीलादेखील करावे असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे.’

‘यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावादेखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला. मी आपला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले. नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही,’ असेही ते म्हणाले.

‘आरोग्याची चौकशी जिव्हाळ्याने व्हावी’
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविताना यंत्रणेतील सर्व लोकांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जनजागृती करणे हे साधेसुधे काम नाही. या मोहिमेचा हेतू केवळ चौकशी करणे नाही, तर आरोग्य नकाशा तयार करणे हे आहे. यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. या सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून संपर्क साधणे व चौकशी करणे महत्त्वाचे आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल’
‘मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे,’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपण करोना रुग्णांचे आकडे खाली आणले; पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नाही. करोनाचे संकट नाहीसे झालेले नाही, तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी-तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही, तर त्सुनामी आहे की काय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे; पण तिच्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. सगळे उघडे केले म्हणजे करोना गेला आहे असा अर्थ कृपा करून काढू नये.’

‘ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्यांना सांभाळा’
‘करोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे. आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता करोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय. हे निश्चितच खूप धोकादायक आहे. आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले, तरी २४ ते २५ कोटी जनतेला द्यावी लागेल. त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहा हीच त्रिसूत्री आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘कोविडनंतर रुग्ण खडखडीत बरेसुद्धा होत आहेत; कोविडनंतर काही दुष्परिणामसुद्धा दिसताहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची?,’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत.’

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply