श्रीमंत होण्यासाठी मराठी उद्योजकांना सॅटर्डे क्लबतर्फे संवादाची संधी

रत्नागिरी : महाराष्ट्रातील उद्योजकता वाढीस लागावी, यासाठी कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे मराठी उद्योजकांसाठी संवादातून संपर्क साधण्याची आणि त्यातून व्यवसाय वाढविण्याची दिशा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकमेकां साह्य करू अवघे होऊ श्रीमंत असे ब्रीदवाक्य असलेल्या या क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) सकाळी आठ ते दहा या वेळेत ऑनलाइन बैठक होणार आहे. ग्रॅण्ड व्हिजिटर्स डे अशी या बैठकीची संकल्पना असून राज्यभरातील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सॅटर्डे क्लबचे सदस्य नसलेल्या उद्योजकांनाही या बैठकीत सहभागी होता येणार आहे.

इंजिनीयर माधवराव भिडे यांनी २००० साली सॅटर्डे क्लबची स्थापना केली. मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी या क्लबची स्थापना करण्यात आली. छोट्या-मोठ्या उद्योजकांनी एकत्र यावे, ही सॅटर्डे क्लबची संकल्पना आहे. ओळखीतून व्यवसाय वाढतो. आपल्या व्यवसायात वाढ करण्याची सुवर्णसंधी मिळते. एकत्र येऊन एकमेकांच्या व्यवसायाच्या वाढीला मदत करणारे मराठी उद्योजकांचे व्यासपीठ, अशी सॅटर्डे क्लबची ओळख आहे. रत्नागिरीमध्येही या क्लबची शाखा आहे.

सॅटर्डे क्लबच्या अवघे होऊ श्रीमंत या ब्रीदवाक्याचा अनुभव या शाखेच्या अनेक सदस्यांनी घेतला आहे. तळेबाजार (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील आरबीएल कन्स्ट्रक्शनचे राजेंद्र लब्धे गेली नऊ वर्षे बांधकाम क्षेत्रात आहेत. सॅटर्डे क्लबचे सदस्य होण्यापूर्वीही त्यांचा व्यवसाय सुरू होताच. पण सॅटर्डे क्लबमुळे त्यांना २२ लाखाचे काम मिळाले. त्यांच्याकडे सध्या ८ कामगार कायमस्वरूपी, तर २०-२२ जण तात्पुरत्या स्वरूपात काम करतात. येत्या पाच वर्षांत आणखी ४०-५० जणांना आपण रोजगार देऊ शकू, असा विश्वास त्यांना सॅटर्डे क्लबमुळे वाटतो. कारण क्लबमुळे त्यांचा अनेकांशी परिचय वाढला. बांधकामाबाबत अऩेकांकडून विचारणा होते. त्यामुळे निश्चिंत झाल्याची खात्री मिळते. कामे मिळण्याची खात्री पटते, तेव्हा मन उभारी घेते. व्यवसाय वाढण्याची खात्री मिळते. लोकांना दर्जेदार कामे आणि चांगल्या सेवेची गरज असते. ती ओळखून इतरांशी व्यवहार करताना बोलण्यात, वागण्यात, राहणीमानात सॅटर्डे क्लबमुळे फक पडला. उद्योग नेमका कसा करावा, याची माहिती मिळाली. ग्राहकाला कशी सेवा द्यावी, विचारपूर्वक कसे बोलावे हे सॅटर्डे क्लबच्या सदस्यांमध्ये निर्माण झालेल्या एक प्रकारच्या कौटुंबिक नात्यामुळे शक्य झाले, असे श्री. लब्धे यांना वाटते.

लांजा (जि. रत्नागिरी) येथील सौ. कांचन चांदोरकर संचालक असलेल्या प्रसिद्ध जोशी फुड्सला १३ वर्षे झाली. त्यावेळी तेथे ५ महिला काम करत असत. सौ. चांदोरकर यांनी पाच वर्षांपूर्वी व्यवसायाची धुरा हाती घेतली. आता त्यांच्या व्यवसायात ४५ महिलांसह ५० लोकांना रोजगार मिळत आहे. सॅटर्डे क्लबमुळे निर्माण झालेल्या ओळखींमुळे त्यांच्या उत्पादनांना चांगलीच बाजारपेठ मिळाली. मुंबईतील एका सदस्याला यावर्षीच्या दिवाळीत ७० हजार रुपयांच्या फराळाची विक्री त्या करू शकल्या. शिवाय परदेशातही त्यांचा फराळ पोहोचू शकला. सॅटर्डे क्लबच्या सदस्यत्वामुळे हे शक्य झाले, असे सौ. चांदोरकर यांनी सांगितले.

तुषार आग्रे (रत्नागिरी) यांच्या स्वराज अॅग्रोमार्फत नारळाच्या झाडांच्या व्यवस्थापनाचा वेगळा आणि कोकणाला साजेसा उद्योग चालविला जातो. नारळाच्या झाडावर होणाऱ्या इरिओफाइड माइटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची सेवा श्री. आग्रे २०१२ पासून पुरवत असत. त्यानिमित्ताने नारळ बागायतदारांशी आलेल्या संपर्कातून त्यांच्या लक्षात आले की योग्य व्यवस्थापन केले, तर नारळाच्या झाडापासून श्रीमंत होता येऊ शकेल. त्यानंतर त्यांनी गेल्या चार वर्षांपासून नारळाच्या झाडांच्या व्यवस्थापनाचा व्यवसाय सुरू केला. माफक शुल्क आकारून झाडांना खते पुरविणे, नारळाच्या फळांची काढणी, उत्पादनांपासून प्रक्रिया करणे अशा स्वरूपाचे हे काम आहे. सॅटर्डे क्लबचे सदस्यस्व स्वीकारल्यापासून अधिकाधिक नारळ बागायतदारांपर्यंत पोहोचणे त्यांना शक्य झाले आहेच, पण कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळाच्या सर्व अवयवांवर प्रक्रिया करणारा भव्य कारखाना येत्या वर्षभरात सुरू करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. या व्यवसायातून येत्या दोन वर्षांत १०० जणांना प्रत्यक्ष, तर १० हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देता येऊ शकेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. सॅटर्डे क्लबच्या कौटुंबिक नात्यांमुळे हे शक्य झाले, अशी त्यांची भावना आहे.

सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष विनोद वायंगणकर यांनी २७ वर्षांपूर्वी आपला व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला वडापावाची गाडी त्यांच्याकडे होती. तेव्हा ५-६ माणसे काम करत होती. पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी हॉटेल सुरू केले. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटक महिलांना माहेरी आल्यासारखे वाटेल आणि मुलांना मामाच्या गावात आल्याचा आनंद मिळेल, असा लौकिक त्यांच्या हॉटेलने निर्माण केला आहे. सॅटर्डे क्लबमुळे राज्यभरातल्या पर्यटकांशी आणि खाद्यप्रेमींशी नाते निर्माण झाले आहे, असे त्यांना वाटते.

सॅटर्डे क्लबचे सदस्यस्व स्वीकारलेल्या उद्योजकांच्या अशा अनेक यशकथा आहेत. त्यांची चर्चा आणि व्यावसायिक देवाणघेवाण सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत केली जाते. करोनाच्या काळात या बैठका झूम ॲपद्वारे ऑनलाइन होत आहेत. येत्या शनिवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत झूम ॲपवरून होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने व्यवसायवाढीसाठी ग्रॅण्ड व्हिजिटर्स डे साजरा केला जाणार आहे. रत्नागिरी चॅप्टरव्यतिरिक्त राज्यभरातील इतर चॅप्टरमधील सदस्यांबरोबरच आपणही आपल्या व्यवसायाचा उत्कर्ष साधून श्रीमंत व्हावे, असे वाटणाऱ्या छोट्या मोठ्या मराठी उद्योजकांनाही या मोफत बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

अधिक माहिती आणि नावनोंदणीकरिता विनोद वायंगणकर (७८४१८७२४३१), सचिव चंद्रकांत राऊत (९९२०४७५१७४) किंवा खजिनदार सौ. मानसी महागावकर (९८९०९९१४०७) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply