कार्तिकी एकादशी : रत्नागिरीतील विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त आज (२६ नोव्हेंबर) रत्नागिरीतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा करण्यात आली. पराग तोडणकर व सौ. तोडणकर यांच्या हस्ते पूजा झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात येणाऱ्या भाविकांना आज केवळ मुखदर्शन मिळत आहे. मंदिरात फार गर्दी नसून, येणारे भाविक रांगेत राहून दर्शन घेत आहेत. भाविकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली आहे. दर वर्षी होणारी रथयात्रा आणि जत्रा यंदा करोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे होणार नाही.
(पूजा आणि मूर्तीचे फोटो : पराग हेळेकर)

माऊलीची आस

आस लागली तुझी माउली चालत आलो वारीला
धन्य धन्य हे झाले जीवन माथा लावुन चरणाला

आज पाहुनी रूप सावळे नेत्र दोन हे सुखावले
तन मन धन हे पायी वाहुन मोह-वासना दुरावले

नुरले काही अता मागणे ठाव मिळावा चरणाशी
मम जिवाचा सखा सावळा दीनदयाघन मजपाशी

भक्तजनांचा मेळा जमला रिंगण फुगडी रंगतसे
भीमाकाठी समानतेची दिंडी अनुपम भासतसे

विठ्ठल विठ्ठल जयघोषातुन आनंदाला ये भरती
परब्रह्माच्या भेटीसाठी टाळ विणाही गुणगुणती…

नामघोष तो ऐकुन सारा आसमंतही गहिवरतो
कणाकणातुन भावभक्तिचा सुगंध अवघा दरवळतो

  • अर्चना देवधर, रत्नागिरी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply