Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोकणातील पहिली गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी अँड हिपॅटोबिलिअरी सायन्सेस इन्स्टिट्यूट रत्नागिरीत

Advertisements

रत्नागिरी : येथील डॉ. संजय लोटलीकर यांच्या रामनाथ हॉस्पिटलमध्ये कोकणातील पहिल्या ममता गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी अँड हिपॅटोबिलिअरी सायन्सेस इन्स्टिट्यूटचे उद्घाटन आज झाले. रत्नागिरीतील पहिले पदव्युत्तर पदवीधारक डॉक्टर आणि ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रमेश चव्हाण यांनी उद्घाटन केले.

यावेळी ते म्हणाले, पोट आणि आतडयाच्या विविध प्रकारच्या विकारांचे दुर्बिणीद्वारे निदान आणि उपचारासाठी या केंद्राचे उद्घाटन होत आहे. डॉ. ममता लोटलीकर-आमोणकर यांनी मोठ्या शहरात असणाऱ्या अशा प्रकारच्या
सुविधा रत्नागिरी शहरात उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या विभागात पित्ताशयातील खड्यासाठी उपचार, अन्ननलिकेच्या विविध भागातील कॅन्सरचे निदान, पोटाच्या, आतड्याच्या अल्सरमुळे होणाऱ्या रक्तरस्रावाचे उपचार अशा उपचारांची सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभ्यास यांची सांगड घालून सुरू होत आहे. या नवीन विभागामुळे रुग्णांच्या आजारांचे योग्य वेळी निदान होऊन पुढील उपचार सुरू करता येतील. या सुविधेचा रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांना लाभ होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

समारंभात ज्येष्ठट डॉ. अलीमियाँ परकार म्हणाले, आज वैद्यकीय ज्ञान आणि तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. त्यामुळे रुग्णाच्या विविध व्याधींवर उपचार करणे सुलभ झाले आहे. पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान रत्नागिरीसारख्या ठिकाणी यायला पंचवीस वर्षे लागत असत. आता तसे तंत्रज्ञान केवळ पंचवीस दिवसांत उपलब्ध होते. त्याचा उपयोग रुग्णांना करून देणे शक्य आहे. डॉक्टरांच्या नव्या पिढीने एकमेकांशी संवाद साधून एकत्रितरीत्या त्याचा उपयोग करावा, असे आवाहन डॉ. परकार यांनी केले.

डॉ. ममता लोटलीकर-आमोणकर यांनी एमडी (मेडिसिन) आणि डीएम (गॅस्ट्रोएन्टरोलॉजी) पदवीपर्यंत घेतलेल्या शिक्षणाविषयीचा धावता आढावा घेतला. मनापासून शिक्षण घेतानाच वैद्यकीय आणि शल्यचिकित्सीय सेवा देण्यासाठी हे केंद्र सुरू केले आहे. वडील डॉ. संजय लोटलीकर यांचे मार्गदर्शन आणि पती डॉ. अमेय आमोणकर यांचे सक्रिय सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळेच आपल्याला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात पोटविकाराची चिकित्सा आणि निदान केले जाईल. अन्ननलिका तपासणी, सूज, अल्सर, पित्ताशयाचे आजार, अॅसिडिटी, आतड्यातील गाठी, अल्सर, लहान आतड्यातील पोटाचे विकार, स्वादुपिंडाचे आजार, कॅन्सर, विविधांगी पोटाचे कर्करोग, स्वादुपिंडातील सूज इत्यादी प्रकारच्या आजारांवर निदान आणि उपचार केले जातील. कोकणातील अशी सुविधा उपलब्ध नव्हती. रुग्णांना कोल्हापूर किंवा मुंबईला जावे लागत होते. त्यात अनेकदा रुग्णाचा मृत्यूही ओढवतो. त्यांच्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. आमोणकर यांनी व्यक्त केला.

सूत्रसंचालन डॉ. दिलीप पाखरे यांनी केले. पनवेल ते सावंतवाडी या भागातील हे एकमेव केंद्र आहे, असे त्यांनी सांगितले. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित नाडकर्णी यांनी स्वागत केले.

समारंभाला डॉ. संजय लोटलीकर, डॉ. अमेय आमोणकर, रुग्णालयातील इतर डॉक्टर्स, तसेच शुभेच्छा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. मनोज मणचेकर यांनी आभार मानले.

समारंभात डॉ. ममता लोटलीकर-आमोणकर यांनी इन्स्टिट्यूटविषयी दिलेली माहिती ऐकण्यासाठी सोबतचा व्हिडीओ पाहा —

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version