सावधान! ती मतदान केल्याची नव्हे, होम आयसोलेशनमध्ये ठेवल्याची खूण!

रत्नागिरी : आपल्या आजूबाजूला कोणाच्या डाव्या किंवा उजव्या हाताच्या बोटावर शाई दिसली, तर सावधान! ती निवडणुकीचे मतदान करून आलेली व्यक्ती नव्हे, तर त्या व्यक्तीला करोना प्रतिबंधासाठी होम आयसोलेशन किंवा होम क्वारंटाइन करण्यात आल्याचे ते निदर्शक आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा नियम अमलात आला असून तो रत्नागिरी जिल्ह्यातही लागू करण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. ते मुंबईहून पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.

श्री. सामंत म्हणाले, बाहेरगावाहून कोकणात येणाऱ्या व्यक्तींनी चौदा दिवस विलगीकरणात किंवा अलगीकरणात राहणे जरुरीचे आहे. रेल्वे स्थानक तसेच एसटी बसस्थानकावर तसे शिक्के त्यांच्या हातावर मारले जात आहेत. मात्र त्या शिक्क्यांसाठी वापरण्यात शाईचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आता वेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावली जाते, त्याच पद्धतीने शाई लावण्याची पद्धत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली आहे. ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला असेल, त्यांच्या डाव्या हाताच्या बोटावर, तर होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलेल्या व्यक्तींच्या उजव्या हाताच्या बोटावर शाई लावली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही हीच पद्धत अमलात आणण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.

श्री. सामंत यांनी जिल्ह्यातील करोनाविषयक विविध समस्या तसेच लसीकरणाचा आढावा घेतला. ते म्हणाले की जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील सहा लाख २३ हजार जण करोनाची लस घेण्यास पात्र आहेत. त्यापैकी आठशे जणांना पहिला डोस काल देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक स्वरूपात सात दिवस वेळापत्रकानुसार डोस दिले जात आहेत. दररोज सरासरी दोनशे जणांना ऑनलाइन नोंदणीनंतरच डोस दिले जात आहेत. या सात दिवसानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात याच पद्धतीचे वेळापत्रक आखले जाणार आहे. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यांनीच त्यांना दिलेल्या वेळेत आपल्या केंद्रावर उपस्थित राहावे. इतरांनी गर्दी करू नये. आयत्यावेळी येणाऱ्या लोकांची नोंदणी केली जाणार नाही, असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

४५ वर्षांनंतरच्या व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र शासनाने घेतली आहे तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण राज्य शासनामार्फत केले जाणार आहे. तयार होणाऱ्या लशींपैकी ५० टक्के पुरवठा केंद्र सरकारला केला जातो. उर्वरित ५० टक्के लशींचे वितरण देशभरातील राज्यांना केले जाते. राज्यातील १२ कोटी लोकांना लस देणे अपेक्षित असून त्यासाठी पैसे भरायला राज्य शासन असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तेवढी शासनाची सज्जता आहे, असे श्री. सामंत म्हणाले. मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला लसनिर्मिती करण्यासाठी ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आङे. तेथे येत्या दोन महिन्यांत लस निर्मिती सुरू होऊ शकेल.

रत्नागिरी जिल्ह्यात ४५ वर्षांहून अधिक व्यक्तींची संख्या चार लाख ५७ हजार १२६ आहे. त्यापैकी ८३ हजार ३५६ जणांना करोनाप्रतिबंधक लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर साठ वर्षांमधील ४५ हजार ६० जणांना लस देण्यात आली आहे. या दोन्ही वयोगटातील १० हजार ६८७ जणांना दुसरी लसही देण्यात आली आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply