करोनाबाधित हेल्पिंग हॅण्ड्सचा कोविड केअर सेंटरमध्येही दिलाशाचा हात

रत्नागिरी : कापूर आगीत भस्मसात होऊनही आपला सुगंध सोडत नाही. तसेच चांगली माणसे आपत्तीच्या काळातदेखील आपले गुण, आपले स्वभाव सोडत नाहीत. याचाच अनुभव एका कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेले रुग्ण घेत आहेत. स्वतः करोनाबाधित झाल्याने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागलेल्या हेल्पिंग हँडच्या सदस्यांनी तेथेही मदतीचा हात पुढे करून रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याचे काम चालविले आहे.

कोविड केअर सेंटर म्हणजे भयाण शांतता असे चित्र डोळ्यांसमोर येते. तेथे असलेले सर्व जण करोनाबाधित असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येण्याची त्यांना भीती वाटत असते. एका खोलीत पुरेसे अंतर ठेवून दोन-चार रुग्णांची व्यवस्था प्रशासकीय पातळीवर केली जाते. पण या रुग्णांनी त्यांच्या कक्षाबाहेर येऊच नये, असे सांगितलेले नसते. पण भीतीमुळे ते बाहेर येत नाहीत. म्हणूनच कोविड केअर सेंटरची शांतता भयाण भासते. ही शांतता दूर करून तेथे चांगले वातावरण निर्माण करण्याचे काम सचिन शिंदे या रत्नागिरीतील एका हेल्पिंग हॅण्डने केले आहे.

सचिन शिंदे, छोटू खामकर, हेमंत चव्हाण आणि त्यांचे अनेक सहकारी करोनाची समस्या रत्नागिरीत सुरू झाल्यापासून हेल्पिंग हॅण्ड या अदृश्य साखळीद्वारे एकत्र आले आहेत. विविध अठ्ठावीस सामाजिक संस्था एकत्र येऊन प्रशासन आणि जनतेला मदत करत आहेत. भाजीपाला, दूध पोहोचविण्यापासून औषधोपचारांसाठी रुग्णालयापर्यंत रुग्णांना नेण्या-आणण्यासाठी, किराणा माल घरपोच देण्यासाठी ही मंडळी कार्यरत आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या सार्यांेचा करोनाबाधित रुग्णांशी संबंध आणि संपर्क येतो. त्यासाठी पुरेशी काळजी घेतली तरी नेमका प्रसार कसा होईल आणि बाधा कशी होईल, हे सांगता येत नाही. अगदी तसेच झाले. हेल्पिंग हॅण्डचे अध्वर्यु राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे, छोटू खामकर, हेमंत चव्हाण यांनाही दोन दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना रत्नागिरीजवळच्या कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या करोना केअर सेंटरमध्ये रवाना करण्यात आले.

मदत करणे हाच ज्यांचा स्थायिभाव आहे, असे सचिन शिंदे आणि त्यांचे सहकारी तेथेही गप्प बसणे शक्यच नव्हते. दाखल केल्याच्या क्षणी त्यांच्या लक्षात आली ती त्या कोविड केअर सेंटरमधील भयानक शांतता. रुग्णांनी पुरेशी काळजी घेणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्यकच आहे. पण त्यांनी परिसरात फिरू नये, आपल्या कक्षांच्या बाहेर येऊच नये, असे काही त्यांना सांगितले नव्हते. विरंगुळा म्हणून मनोरंजनपर कार्यक्रम करणे, दैनंदिन स्तोत्रपठण, गाणी लावून मनाचा ताण हलका करू नये, असेही काही त्यांना सांगण्यात आले नव्हते. पण हे सारे करा, असेही कोणी सांगितले नव्हते. त्यामुळे तेथे दाखल झालेला प्रत्येक रुग्ण आपली केव्हा एकदा सुटका होईल, याची वाट पाहत दिवस मोजत बसलेला असतो. त्याला त्या वातावरणातून बाहेर काढण्याचे काम सचिन शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. प्रशासकीय पातळीवर योगासने किंवा व्यायाम करून घेतला जात असला तरी तो सकाळच्या वेळी होतो. राहिलेले २२ तास इतर काहीही नाही. त्यामुळे रुग्ण फारच कंटाळतात. हा त्यांचा कंटाळलेपणा लक्षात आल्यानंतर तेथील वातावरणात मोकळेपणा आणण्याचे काम सचिन शिंदे आणि त्यांच्या सहकार्यां नी केले. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माची मंडळी तेथे असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार गाणी लावणे, सकाळी गायत्री मंत्र, स्वामी समर्थांचा जप, स्तोत्रांचे पठण करणे, मुस्लिम धर्मीयांचा रमजान महिना सुरू असल्यामुळे कुराणातील आयता, यादेन शरीफमधील पवित्र स्तोत्रांचे पठण करणे असे असा उपक्रम श्री. शिंदे यांनी सुरू केला. फोनच्या ब्लू टूथवर हे त्यांनी सुरू केले. त्यामुळे त्या करोना केअर सेंटरचे वातावरणच बदलून गेले. रुग्णांमध्ये एकदम उत्साह संचारला. करोनाविषय सारे नियम पाळून ते हिंडू फिरू लागले. त्यांचा ताण चांगलाच हलका झाल्याचे दिसत होते. सर्व जण जेवून शतपावली करत आणि फर्माईश केल्यानंतर लावलेल्या गाण्याचा आस्वाद घेत होते.

पुन्हा केव्हा जर करोनाबाधित म्हणून करोना केअर सेंटरमध्ये राहण्याची वेळ आलीच, तर आपल्याला आंबेडकर भवन करोना केअर सेंटरमध्येच ठेवण्याची विनंती आपण करणार आहोत, अशा शब्दांत तेथे दाखल झालेल्या काही रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावरूनच तेथील बदललेल्या वातावरणाची कोणालाही कल्पना येऊ शकेल. करोनाबाधित रुग्णांचे मानसिक आरोग्य राखण्याचे काम शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निश्चितपणे केले आहे. स्वतःच करोनाबाधित रुग्ण असून पण लक्षणे खूपच सौम्य असल्याने श्री. शिंदे यांनी आपला मदतीचा स्वभाव तेथेही याच पद्धतीने प्रकट केला, हे विशेष.

हेल्पिंग हॅण्ड्सच्या दिलाशानंतर सुखावलेले रुग्ण
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply