तौते चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागांना फटका

रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात आंबोळगड परिसरात दुपारी दाखल झाले. या वादळामुळे राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात जोरदार वादळी वारे वाहत आहेत.‌

समुद्रात सुमारे तीन मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. राजापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक एक तास ठप्प झाली होती. झाड बाजूला करून ती पुन्हा सुरू झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. मात्र जिल्ह्यात संचारबंदी जारी असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ नाही. राजापूर तालुक्यात विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. दूरध्वनी सेवाही विस्कळित झाली आहे.

आज दुपारी रत्नागिरी जिल्ह्यात वादळ दाखल होण्यापूर्वी राजापूर तालुक्यातल्या आंबोळगड परिसरातल्या तीन गावांमधील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे. राजापूर तालुक्यात सागवे, नाटे, जैतापूर, मुसाकाझी परिसरात वादळी वारा आणि पाऊस सुरू झाला आहे. आंबोळगडमधील ६८ कुटुंबांमधील २५४ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मुसाकाझी येथील दोन कुटुंबांतील लोकांचे, तर आवळीचीवाडी येथील ७ कुटुंबांमधील ३५ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली. ते हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम त्वरित सुरू झाले. नाटे आणि परिसरात वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. जैतापुरात वादळी वाऱ्यांमुळे घरांची किरकोळ पडझड झाली आहे. प्रशासन सज्ज असून किनारी भागांवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात आले आहे.

चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून रत्नागिरीत जोरदार वाऱ्यांसह पाऊसही पडू लागला आहे. वादळापूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. इतरही काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली आहेत. ती बाजूला करण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यात पहाटेपासून हलके वारे वाहण्यास सुरवात झाली. अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. रत्नागिरी शहरात झाडे मोडून पडल्याने काही घरांचे नुकसान झाले, तर काही घरांचे नुकसान थोडक्यासाठी टळले. ती झाडे बाजूला करण्याचे काम नागरिकांनी सुरू केले. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड, गणेशगुळेसह परिसरातील ८५ कच्च्या घरातील नागरिकांचे आजूबाजूच्या घरात स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सर्वांत मोठ्या मिरकरवाडा बंदरामध्ये सुमारे ५०० मच्छीमारी नौका उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. वादळामुळे त्यावरील खलाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव, सहायक मत्स्य आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आज सकाळी मच्छीमारांशी संवाद साधला. अनेक मच्छीमारांनी खलाशांना आपापल्या गोदामात जागा उपलब्ध करून दिली आहे. सुमारे दीड हजाराहून अधिक खलाशी आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात कालपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ३९ मिमी पाऊस पडला. संगमेश्वरात २२ मिमी, दापोली आणि गुहागरात प्रत्येकी १२ मिमी, लांजा आणि राजापूरला प्रत्येकी १३ मिमी पाऊस पडला.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply