तोक्ते चक्रीवादळाने कोकणचा निरोप घेतला.. अशा निसर्गप्रकोपानंतरची परिस्थिती भीक नको पण कुत्रा आवर, अशी होऊन जाते. प्रातिनिधिक पाहणी करून जर सगळ्या नुकसानाची कल्पना येत असेल तर पंचनामे पण अशा प्रातिनिधिक पाहणीवरच केले जातात का? नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जे धोरणात्मक उपाय करायला हवेत, त्यातले किती उपाय या मंडळींकडून सांगितले जातात?
……………………………………………………….
तोक्ते चक्रीवादळाने कोकणचा निरोप घेतला.. पण यथाशक्ती संहार करूनच.. अनेक मोठे वृक्ष, विजेचे खांब घरांवर पडले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं… अर्थात ज्यांच्या घरांची पडझड झालीय त्यांचं दु:ख, वेदना या अशा वाचून, सांगून कळणार नाहीत, ते ज्यांनी अनुभवलंय त्यांनाच ठाऊक. पण अशा निसर्गप्रकोपानंतरची जी परिस्थिती असते ती मात्र भीक नको पण कुत्रा आवर, अशा प्रकारची होऊन जाते. गेल्या कित्येक आपत्तींनंतर त्यात कोणताही बदल होताना दिसत नाही.
मुळात आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन नावाची काही व्यवस्था शिल्लक आहे का, असा प्रश्न पडावा इतकी त्या विभागाची अवस्था आहे. त्यामुळे आलेल्या आपत्तीला तोंड द्यायला आपण सक्षम नसतो आणि तसं सक्षम व्हावं, असं अजून आपल्याला कधीही वाटलेलं नाही, ही त्या आपत्तीपेक्षाही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे अर्थातच अशी मोठी आपत्ती आली की सामान्य माणूस सैरभैर होतो आणि नेमकी हीच गोष्ट अनेकांना इष्टापत्ती वाटते.
अशा नैसर्गिक प्रकोपानंतर आपण जर पाहाल तर राजकारण्यांमध्ये मदत करण्याची जणू काही स्पर्धा लागली आहे की काय, असं वाटावं असं चित्र त्याच्या विविध प्रकारच्या बातम्यांमधून दिसतं. पण हे सर्व करीत असताना मूळ अजेंडा मदत करण्याचा असतो की स्वत:ची प्रतिमा संवर्धनाचा, हा प्रश्न पडतो. मुळात दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात, त्या म्हणजे जे लोकप्रतिनिधी अशा प्रकारची मदत करतात असं आपल्याला बातम्यांमधून वाचायला मिळतं, त्यापाठोपाठ तेच खरे जनतेचे कसे कैवारी वगैरे अशा बातम्या मूळ मदतीच्या बातम्यांपेक्षा मोठ्या होऊन समोर येतात. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची अडीअडचणीच्या वेळेला मदत करायलाच हवी, ते त्यांचं कर्तव्यच आहे किंबहुना त्यासाठीच आपण त्यांना निवडून दिलं आहे, हेच सामान्य जनता विसरुन जाते. मग कर्तव्य म्हणून केलेल्या गोष्टी उपकार वाटायला लागतात. खरी मनापासून मदतच करायची असेल तर त्याची जाहिरात कशाला? असं म्हणतात की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू देता कामा नये.. इथे तर हे दान नाहीच आहे, जनतेचाच पैसा जनतेच्याच भल्यासाठी वापरायचा आहे. त्याला एक व्यवस्था हवी म्हणून शासन यंत्रणा निर्माण झाली आहे. असं असेल तर हे उपकाराचं ओझं कशासाठी? आपला लोकप्रतिनिधी कसा रात्रीचा दिवस करून आपल्यासाठी झटत आहे हे सांगण्याची अहमहमिका तरी कशाला? प्रश्न कौतुक करण्याचा नसतो, म्हातारी मेल्याचं दु:ख कोणालाच नसतं.. काळ सोकावतो, कर्तव्य हे उपकार वाटायला लागतं आणि समाजाची मानसिकता बदलते.
अशा प्रकारच्या आपत्तीनंतरचा आणखी एक विषय म्हणजे नुकसानीचे पंचनामे आणि नुकसानभरपाई. हे पंचनामे कसे होतात हा आणखी एक संशोधनाचा विषय! पण ते इतक्या लवकर उरकले जातात की प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा जणू हेवा वाटावा… आपत्तीनंतर अगदी २४ किंवा ३६ तासांत रुपये-पैशात अचूक नुकसान किती झालं, याचे आकडे जाहीर होतात. याचं पुढे काय होतं, याचा अभ्यास केलाय का कुणी? या सगळ्या प्रक्रियेला जर नुकसानभरपाई म्हणत असतील, तर ही भरपाई खरंच होते का? जी होते त्याला भरपाई म्हणावं का? आणि हे होत नसेल तर या सगळ्या प्रक्रियेचा अर्थ काय? समाजाची स्मरणशक्ती अल्प असते, असं म्हणतात त्याचा घेतलेला हा फायदा आहे का?
असाच अजून एक प्रकार म्हणजे झालेल्या नुकसानाची पाहणी करणं… प्रातिनिधिक पाहणी करून जर सगळ्या नुकसानाची कल्पना येत असेल तर पंचनामे पण अशा प्रातिनिधिक पाहणीवरच केले जातात का? या पाहणीसाठी खर्च होणारी शक्ती, मग ती मनुष्यबळाची असेल अथवा आर्थिक असेल, त्याच आपत्तीग्रस्तांना द्यायला वापरली तर… पण पुन्हा प्रश्न तोच, असं केलं तर आपली प्रतिमासंवर्धनाची मोहीम राबविता येणार नाही याची काळजी…
अशा प्रकारच्या आपत्तीनंतर सत्ताधारी पक्षानं आपण कसे जनतेच्या बाजूने उभे राहिलो, असं सांगायचं आणि विपक्षाने सत्ताधारी पक्ष कसा अपयशी ठरला, हे सांगायचं. मग त्याच्या टीकाटिपण्या.. सामान्य जनता या त्याच आणि त्याच सगळ्या प्रकाराला विटलीय, याचं भान या लोकांना कधी येणार कोण जाणे?
अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जे धोरणात्मक उपाय करायला हवेत, त्यातले किती उपाय या मंडळींकडून सांगितले जातात? बाकी फार लांबच्या गोष्टी जाऊ देत, किमान आपल्या मालमत्तेचा विमा काढणं एवढ्या एका साध्या गोष्टीचं प्रबोधन होतानासुद्धा कुठे दिसत नाही. कारण असं करून सामान्य माणूस स्वयंपूर्ण झाला तर आपल्या प्रतिमासंवर्धनाचं काय, अशी भीती असते का?
कधीतरी या सर्व गोष्टींचा साकल्यानं विचार करण्याची गरज आहे. अन्यथा कर्तव्य म्हणून केलेल्या गोष्टीच्या ऐवजी उपकाराच्या ओझ्याखाली सामान्य माणूस भरडला जात राहणार हे नक्की…
- निबंध कानिटकर
(संपर्क – ९४२२३७६३२७)

