कोकणातील विजेच्या तारांना जालन्यातील खांबांचा आधार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात तौते चक्रीवादळामुळे निर्माण झालेला वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी राज्याच्या इतर भागातूनही साहित्य आणले जात आहे. आज जालना येथून खां आणि ट्रान्स्फार्मर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दरम्यान, महावितरणने सुरू केलेल्या युद्धपातळीवरील कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.

रत्नागिरी जिल्ह्यात तौते चक्रीवादळामुळे महावितरण कंपनीला मोठा फटका बसला. साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. ती यंत्रणा पुन्हा एकदा उभी करण्यासाठी महावितरण कंपनीला सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. वादळाने जिल्ह्यातील चिपळूण, खेड आणि रत्नागिरी विभागात एक हजार २३९ गावांमधील वीजपुरवठा बंद पडला होता. गेल्या चार दिवसांत कंपनीचे कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि स्थानिक ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर एक हजार २१६ गावांतील वीजपुरवठा सुरळित केला आहे. त्याकरिता लागणारे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि अन्य साहित्याची कोणतीही कमतरता पडणार नाही, याची दक्षता कंपनीकडून घेण्यात येत आहे. आजच जालना आणि अन्य ठिकाणांहून खांब तसेच इतर अन्य साहित्य रत्नागिरीत दाखल झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जाणार आहे.


दरम्यान, जिल्ह्याच्या आणखी काही भागातील वीजपुरवठा सुरू करण्यात महावितरण कंपनीला यश आले आहे. त्याचा आज, २१ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा तपशील असा –
एकूण बाधित एक हजार २३९ गावांपैकी एक हजार २१६ गावांचा वीजपुरवठा सुरू. २३ गावांचा बाकी.
बंद पडलेली सर्व ५५ उपकेंद्रे सुरू.
एकूण बाधित ७५४८ ट्रान्सफॉर्मरपैकी ७३७५ सुरू. १७३ दुरुस्त व्हायचे आहेत.
एकूण ५,५४,९२१ वीजजोडण्यांपैकी ५,४८,१६७ सुरू. ६७५४ सुरू होणे बाकी.
हाय टेन्शन ४८९ बाधित खांबांपैकी २८१ पुन्हा उभे. २०८ उभे राहायचे आहेत.
लो टेन्शन १३१६ खांबांपैकी ४३३ उभे राहिले. ८८३ शिल्लक.
मनुष्यबळ – कंपनीच्या ७१ पथकांमधील ९१० माणसे.
कंत्राटी ३३ पथकांमधील ३०४ माणसे.

महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, श्री. शिवतारे आणि कैलास लवेकर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या महावितरण कंपनीच्या नुकसानाची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मान्यवर

मुख्यमंत्र्यांकडून महावितरण कंपनीचे कौतुक
तौते चक्रीवादळाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा तडाखा दिल्याने महावितरण कंपनीचे जबरदस्त नुकसान झाले. त्यात करोना संसर्गाची आपत्कालीन परिस्थिती असल्याने मोठी आणि कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, मोबाइल टॉवर, पाणीपुरवठा, घरगुती आणि इतर ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी महावितरणने नियोजनबद्ध सुरू केलेल्या युद्धपातळीवरील कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकणातील पाहणी दौऱ्यात कौतुक केले.

चक्रीवादळाने मुसळधार पावसासह प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ६७८ गावांमधील वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला. सर्वाधिक तडाखा सिंधदुर्ग जिल्ह्याला बसला. करोना महामारीच्या काळात २५ कोविड रुग्णालये आणि सिंधदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या दवाखान्यातील ८५ टक्के रुग्ण करोनाबाधित होते. जिल्ह्यात सर्वत्र मोठमोठी झाडे वीजवाहिन्यावंर पडल्याने वीज यंत्रणा जमीनदोस्त झाल्याने सर्वत्र वीजपुरवठा खंडित झालेला असताना जिवाची पर्वा न करता महावितरणने युद्धपातळीवर काम केले आणि २४ तासांच्या आत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा सुरू केला. अशा कठीण परिस्थितीत महावितरणने केलेल्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे कामे तातडीने व्हावे, यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विशेष लक्ष देत बारामती, कोल्हापूर व औरंगाबाद येथील मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व साहित्य पाठविण्याचे निर्देश दिले होते. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिंधुदुर्ग येथील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामांचा समन्वय साधण्यासाठी मुंबई मुख्यालयातील दोन मुख्य अभियंत्यांना पाठविले होते. कोल्हापूर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचा ९८ टक्के वीजपुरवठा सुरळित करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वीजपुरवठा बंद पडलेल्या १ हजार २३९ गावांपैकी १ हजार २१२ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३९ गावांपैकी ३४४ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ३०६ कोविड रुग्णालये व लसीकरण केंद्रांचा तसेच १४ ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटचा बाधित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply