चक्रीवादळाचे नुकसान १०० कोटीचे, सरकार दाखवते ८-१० कोटी!

रत्नागिरी : कोकणात नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळाने किमान १०० कोटीचे नुकसान झाले आहे. सरकार मात्र ८ ते १० कोटीचे नुकसान दाखवून फसवणूक करत आहे, अशी टीका महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली.

अशी अपुरी माहिती देऊन मुख्यमंत्री दौरा करून परत जात असतील, तर कोकणातील वादळग्रस्तांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही, असेही ते म्हणाले.

तौते चक्रीवादळाच्या नुकसानीबाबत आयोजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीचा तीन कोटीचा आकडा देण्यात आला आहे. तो पटणारा नाही. अवघी १७ कोसळल्याचे अहवालात म्हटले आहे. पण जिल्ह्यातून ठिकठिकाणी खूप घरे कोसळली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या पाहणीच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्यात पाच हजार, सिंधुदुर्गात एक हजार, तर रायगड जिल्ह्यात ८०० घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हापूस आंब्याचे ३ आठवडे, मासळीचे ३ आठवडे नुकसान झाले आहे. हापूस आंबे जमिनीवर पडून त्यांचा चिखल झाल्याने मोठे नुकसान झाले. तेच नुकसान काही कोटींचे होऊ शकेल. अखेरच्या टप्प्यातील आंबा कॅनिंगसाठी जातो. तोय यावर्षी जाऊ शकला नाही. त्यामुळे प्रक्रिया उत्पादन करायचे की नाही, हा प्रश्न कारखानदारांसमोर आहे. तेही नुकसान मोठे आहे.
शासकीय आकडेवारी मात्र केवळ २५०० हजार हेक्टरचे बागायतीचे नुकसान झाल्याचे सांगते. त्याचा मेळ लागत नाही. प्रत्यक्षात किमान १०० कोटींचे नुकसान झाले आहे.

श्री. भांडारी म्हणाले, गेल्या २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतीचे नुकसान झाले. विद्यमान मुख्यमंत्री तेव्हा पदावर नव्हते. त्यापूर्वीच्या त्यांनी पंचनाम्याची औपचारिकता नको, बळीराजाला हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या, असे विधान केले होते. त्यानंतर काही दिवसांनी ते मुख्यमंत्री झाले. तेव्हाही बळीराजाला काही मिळाले नाही. गेल्या वर्षी कोकणाला निसर्ग चक्रीवादळामुळे हानी सोसावी लागली. त्याची पाठपुरावा अजून आम्ही करतो आहोत. पण पैसे मिळाले नाहीत. मच्छीमारांना भरपाई मिळालेली नाही. निवेदने देऊन, पाठपुरावा करून आम्ही दमलो. त्याला उत्तर नाही. साधी पोचही दिली नाही. शिवसेना राज्याचे नेतृत्व करते. शिवसेनेला कोकणाने मोठे केले. हात दिला. त्या ताकदीवर शिवसेना उभी आहे. पण त्याच शिडीला लाथ मारायचे काम शिवसेनेने केले आहे. याचे कारण सरकारला लोकांच्या समस्या सोडवण्याची गरज वाटत नाही.

पंचनामे योग्य पद्धतीने झाले नाहीत का, असा प्रश्न विचारता श्री. भांडारी म्हणाले, झालेल्या नुकसानीचे जागेवर जाऊन पंचनामे झालेले नाहीत. नाहीतर असे आकडे चुकीचे आले नसते. आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये चर्चा केली जात होती. समजून घेण्याची सरकारची मानसिकता होती. आता तीसुद्धा नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन कोकणातील जनतेचे मोठे नुकसान केले आहे.

श्री. भांडारी म्हणाले, येत्या दोन दिवसांत भाजप एक प्लॅटफॉर्म तयार करणार आहे. नुकसान झालेल्यांनी स्वतःचा व्हिडीओ तेथे अपलोड करावा, अशी ती कल्पना आहे. स्वतंत्रपणे ही माहिती गोळा केली जाणार आहे.
सरकारला प्रत्यक्ष नुकसान समजावे, यासाठी हा प्रयत्न आहे. त्याची दखल शासन घेणार का, हा प्रश्न आहे. तक्रारी नोंदवणे हे आपले काम आहे. ते आपण केले पाहिजे. भरपाईसाठी निकषात बदल करता येतील. कर्मचारी-अधिकाऱ्यांनी हे निकष तयार केले आहेत. सरकारने आपले अधिकार वापरावेत आणि जनतेचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply