शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०१८ रोजी वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षांत रुग्णालय पूर्ण होऊन रुग्णांच्या सेवेत दाखल झाले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने रुग्णालयातील सोयीसुविधांचा आढावा.
……………………
सुरुवातीस वेंगुर्ले नगरपालिकेचा दवाखाना तेथे होता. त्यानंतर पालिकेने ही इमारत आणि जागा शासनाकडे हस्तांतरित केली. त्यामुळे वेंगुर्ले तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय जुलै २००० मध्ये सुरू झाले. याच जागेत ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा ध्यास तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी घेतला होता. त्यानुसार वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करायला शासनाने मान्यता दिली. तसेच इमारतीच्या बांधकामासाठी ६ कोटी ६९ लाख ४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर २६ जानेवारी २०१८ रोजी भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. साडेतीन वर्षांमध्ये इमारत बांधकाम पूर्ण होऊन त्याचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
आता हे रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. वेंगुर्ले तालुक्यात शिरोडा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून आता या तालुक्यात नव्याने आणखी एक ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत झाले आहे.
या उपजिल्हा रुग्णालयात विविध आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
सध्या रुग्णालयात क्ष-किरण यंत्र, रक्तचाचणीकरिता ऑटोमेटिक सेल काऊंटर, सेमी ऑटो ॲनालायझर, मल्टीपॅरा मॉनिटर, पल्स ऑक्सीमीटर, सर्जिकल क्वाटरी, नवीन रुग्णवाहिका, १०८ सेवा, ईसीजी मशीन या प्रकारच्या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत. फिजिशियन, जनरल सर्जन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ असे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत. आंतररुग्ण विभागात जनरल मेडिसीन, जनरल सर्जन, बालरुग्ण, स्त्री रोग आणि प्रसूती सेवा, रक्तासाठा या सुविधा मिळणार आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान – आयपीएचएस कार्यक्रमातून रुग्णालयीन कामकाजानुसार खासगी डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच जनरल सर्जरी आणि स्त्रीरोग, प्रसूतीसेवेतील शस्त्रक्रियांसाठी हत्यारे, उपकरणे, गंभीर रुग्णाला सेमी आयसीयू उपचार देण्यासाठी उपकरणांची उपलब्धता आहे. आहार सेवा, वस्त्रधुलाई सेवेही उपलब्ध असेल.
मनुष्यबळ – उपजिल्हा रुग्णालयाकरिता गट अ ते ड पर्यंत ४६ पदांचा आकृतिबंध असून त्यापैकी ग्रामीण रुग्णालयाची २५ पदे त्यामध्ये समाविष्ट होतील. उपजिल्हा रुग्णालय स्थापन झाल्याने आता वेंगुर्ले तालुका मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय कार्यरत न राहता उपजिल्हा रुग्णालय म्हणून ते कार्यरत राहणार आहे.
करोनाच्या संकटकाळात जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या कार्याला तोड नाही. रुग्णसेवेसोबतच रुग्णांसाठीच्या सोयीसुविधा वाढवण्यावरही भर दिला जात आहे. कोविड प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. त्यानंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवण्यात आली. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांची संख्याही वाढवण्यात आली. अनेक ठिकाणी डीसीएचसीची स्थापना करण्यात आली. आता वेंगुर्ले येथे ५० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय कार्यरत झाले आहे. त्याचबरोबर २५ खाटांचे डीसीएचसीही सुरू करण्यात आले आहे.
एकूणच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम तर होत आहेच, पण त्याचबरोबर रुग्णांचा चांगली सेवाही देण्यात येत आहे. हे रुग्णालय म्हणजे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील आणखी एक टप्पा पूर्ण झाल्याचेच द्योतक आहे. याशिवाय भविष्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात लवकरच मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये हृदयरोग, कर्करोग, युरॉलॉजी, डायलेसिस, न्यूरॉलॉजी, अतिदक्षता विभाग अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. जिल्ह्यात आणखी ३ नविन उपजिल्हा रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये देवगड, दोडामार्ग आणि मालवणचा समावेश आहे. जिल्ह्यात अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

