रत्नागिरीच्या लायन्स क्लब नेत्ररुग्णालयात नेत्रदानाची सुविधा सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीतील लायन्स क्लब नेत्र रुग्णालयात नेत्रदानाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करून तेथे नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जगातील एकूण दृष्टीहीन व्यक्तींपैकी सुमारे २० टक्के म्हणजे सुमारे सव्वा कोटी दृष्टीहीन भारतात आहेत. त्यातील सुमारे ३० लाख म्हणजे सुमारे २५ टक्के नेत्रहीन व्यक्तींनाच नेत्ररोपणाने पुन्हा दृष्टी मिळू शकते. नेत्ररोपण म्हणजे केवळ पारपटलाचे (कॉर्निया) रोपण असते. जेथून प्रकाश डोळ्यात आतमध्ये शिरतो, तो डोळ्याचा पातळ पडदा म्हणजे पारपटल. हाच पडदा निकामी झाल्याने किंवा निकामी असल्यास बाधित व्यक्ती डोळ्यांत शिरणारा प्रकाशच अनुभवू शकत नसल्याने त्यांना दिसत नाही. हेच निकामी पारपटल बदलून मरणोत्तर केलेल्या पारपटल दानामुळे अशा व्यक्तीला दृष्टी मिळू शकते. नेत्रदान रक्तदानासारखे जिवंतपणी करावयाचे नसून मरणोत्तरच करावयाचे असते. दरवर्षी देशात वेगवेगळ्या कारणांमुळे सुमारे ८० लाख मृत्यू होतात. परंतु त्यातील केवळ तीस हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते. याव्यतिरिक्त जे नेत्ररोपण होते, त्यासाठी श्रीलंकेतून मोठ्या प्रमाणात दान केलेले नेत्र आयात केलेले असतात. म्हणून प्रत्येक भारतीयाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून आपल्या जवळच्या नातेवाईकांना तशी इच्छा बोलून ठेवावी. तसेच आपल्या जवळील नेत्रपेढी किंवा नेत्रसंकलन केंद्रामध्ये यासंदर्भात नोंद करून ठेवावी.

आतापर्यंत रत्नागिरी शहर आणि परिसरात नेत्रपेढी किंवा नेत्रसंकलन केंद्र उपलब्ध नव्हते. पण गेल्या ४ वर्षांच्या प्रयत्नानंतर नेत्रदानासंदर्भातील ही सोय पुण्यातील एच. व्ही. देसाई नेत्रपेढी आणि रत्नागिरीतील लायन्स नेत्ररुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या अत्यावश्यक सेवेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्रविभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे.

रत्नागिरीकरांनी नेत्रदान चळवळ ही राष्ट्रीय गरज आहे याची जाणीव ठेवून या चळवळीत जास्तीत जास्त सहभाग नोंदवून दृष्टीहीन बंधू भगिनींना आपल्या मृत्यूनंतर सुंदर जग दाखवण्यासाठी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी यापूर्वीच जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्र विभागात मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज भरून ठेवले असतील, त्यांनी तसेच ज्यांना नेत्रदानासंदर्भात अधिक माहिती हवी असेल त्यांनी रत्नागिरीत एमआयडीसीतील लायन्स नेत्ररुग्णालयात नेत्रसंकलन केंद्रात 70660 33707 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply