सिंधुदुर्गनगरी : ख्यातनाम मराठी गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती जपण्यासाठी मधुसूदन नानिवडेकर गझल मंच स्थापन करण्याचा संकल्प गझलप्रेमींनी सोडला असून त्याबाबतच्या सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मधुसूदन नानिवडेकर यांचे गेल्या ११ जुलै रोजी तळेरे येथे निधन झाले. ‘निघावयास हरकत नाही’, या आपल्या गझलेप्रमाणे नानिवडेकर कोणतीही हरकत न घेता दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. तो दिवस आषाढाचा पहिला दिवस होता. त्यामुळे मराठी गझलेचा मेघदूत आपल्याला सोडून गेला, अशा गझलप्रेमींच्या भावना आहेत. अतिशय संवेदनशील मनाच्या या प्रतिभावंत गझलकाराची स्मृती चिरंतन राहावी, असे सगळ्यांना वाटत आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग मधुसूदन नानिवडेकर गझल मंचाची स्थापना करून दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी त्यांचा स्मृती समारोह साजरा करण्याचा संकल्प आहे.
मधुसूदन नानिवडेकर यांच्या गझलांनी महाराष्ट्राला वेड लावले. त्यांच्या गझलेच्या चांदण्यात रसिक न्हाऊन निघाले. त्यामुळे त्यांचे जाणे मराठी गझलप्रेमींसाठी आणि काव्यरसिकांसाठी मोठाच धक्का आहे. नानिवडेकर यांच्यावर आणि त्यांच्या गझलांवर नितांत प्रेम करणाऱ्या साहित्य रसिकांनी एकत्र येऊन त्यांच्या स्मृती जपण्याचे ठरवले आहे.
गझलमंच आणि स्मृती समारोहासंदर्भात सूचना मागवण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यप्रेमी तसेच महाराष्ट्रातील गझलप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी स्मृती समारोह साजरा करता येईल.
याबाबतच्या सूचना शशिकांत तिरोडकर (९४०५२६२८६९) यांच्याकडे पाठवाव्यात, असे सूचित करण्यात आले आहे.

