चिपळूणला ‘लोटिस्मा’मध्ये महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालन सभागृहात महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने आज (२ ऑक्टोबर २०२१) महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ शिल्पकार कै. रघुवीर कापडी यांचे पुतणे सुरेश कापडी, युवा शिल्पकार संदीप ताम्हणकर आणि वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव उपस्थित होते.

या वेळी बोलताना आमदार निकम म्हणाले, की महात्मा गांधी यांची त्याग करण्याची त्यांची वृत्ती आपण अंगrकारली पाहिजे. त्यांचे कार्य लोकांसमोर यायला हवे. लोभापासून दूर राहून गांधीजींचा साधेपणा स्वीकारून आपण कार्य करायला हवे. आपल्याकडे सुंदर काम करणारे कलाकार आहेत असे सांगून त्यांनी कापडी कुटुंबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

लोटिस्माच्या कलादालन सभागृहात महात्मा गांधींच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, ज्येष्ठ मूर्तिकार कै. रघुवीर कापडी यांचे पुतणे सुरेश कापडी आणि युवा शिल्पकार संदीप ताम्हणकर आदी.

प्रशांत यादव म्हणाले, महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त एक चांगले काम आपल्या हातून घडत आहे, हे आपले भाग्य आहे. गेल्या काही वर्षांपासून महात्मा गांधींच्या पुतळ्याची कमतरता भासत होती. आज या पुतळ्याचे अनावरण झाल्याने लोटिस्माच्या वैभवात भर पडणार आहे. सध्या देशाला गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता या विचारांची गरज आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचे काम आपण करू या, असे ते म्हणाले.

या पूर्णाकृती पुतळ्याच्या नवनिर्मितीसाठी सहकार्य केल्याबद्दल लोटिस्माच्या वतीने अध्यक्ष डॉ. यतिन जाधव यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांची मूर्ती आणि उपरणे प्रदान करून प्रशांत यादव यांचा सन्मान करण्यात आला. शिल्पकार कै. कापडी यांचे पुतणे सुरेश कापडी आणि शिल्पकार संदीप ताम्हणकर यांना आमदार निकम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

वाचनालयाच्या संचालकांसह महात्मा गांधींच्या विचारांवर प्रेम करणारी मंडळी बहुसंख्येने या वेळी उपस्थित होती. वाचनालयाचे संचालक धीरज वाटेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केले. या वेळी त्यांनी गांधीजींच्या, श्रीगांधारेश्वर येथे १२ फेब्रुवारी १९४८ ला उभारण्यात आलेल्या रक्षा कलश समाधी मंदिराविषयी आणि १९३० साली गाधीजींच्या हयातीत हा पुतळा उभारणाऱ्या कै. रघुवीर कापडी यांच्या शिल्पकलेविषयी माहिती दिली.

मूळ पुतळा खराब झाल्याने नव्याने फायबरमध्ये त्याचे रूपांतर करण्याचे काम शिल्पकार संदीप ताम्हणकर यांनी केले आहे. लोटिस्माच्या संचालिका मनीषा दामले यांनी सर्वांचे आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply