मुख्य निवडणूक अधिकाऱ्यातर्फे भोंडला स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकशाही भोंडला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

लवकरच सुरू होणार असलेल्या नवरात्रोत्सवाचे भोंडला गीते हे वैशिष्ट्य आहे. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने लोकशाही भोंडला स्पर्धा आयोजित केली आहे. आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची असून तिने लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून आणि गावाच्या, देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी निवडावा, या आशयाच्या भोंडला गीतांची ध्वनिचित्रफित स्पर्धेत सादर करायची आहे. येत्या ७ ते १५ ऑक्टोबर या काळात या ध्वनिचित्रफिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठीचा अर्ज https://forms.gle/G8TSjHyFN9hzatzH9 या लिंकवर उपलब्ध असून, त्यावर ध्वनिचित्रफित पाठवावी. या स्पर्धेत एकल किंवा समूह दोन्ही प्रकारची गीते पाठवता येतील. एक समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा आणि एकच गीत पाठवावे. गीताची ध्‍वनिचित्रफित किमान दोन तर कमाल चार मिनिटे कालमर्यादेची असावी. आकार ३०० एमबी आणि एमपी-४ प्रकारात असावी. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवून संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी सासर-माहेरच्या जागी लोकशाही-हुकूमशाही यांची प्रतीकात्मक रचना करायला आणि त्यांचे विशेष सांगायला खूपच वाव आहे. काही गीतांमध्ये माहेरी जाऊ इच्छिणाऱ्या सुनेला सासू एकेक काम सांगत जाते आणि तिचे माहेरी जाण्याचे स्वप्न लांबणीवर पडते. याच प्रकारे आधुनिक स्त्रीला कामाच्या धबडग्यात तिची मतदार म्हणून नावनोंदणी किंवा लग्नानंतर झालेल्या नावात बदल करणे, यांसारख्या कामांत चालढकल होते. गीतांच्या माध्यमांतून असे प्रसंग निवडून गीतरचना करता येतील.

लोकगीतांच्या अंगभूत लवचीक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचे मानस गुंफणेही सहज शक्य आहे. त्यामध्ये तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसे व्हावे, हे सांगता येईल. आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे, निर्णयक्षम आहे; हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या, देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असे आवाहन करता येईल.

स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना ११ हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येतील. उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची दहा बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. आलेल्या भोंडला गीतांतून सर्वोत्तम गीते निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजकांकडे राहील. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल, अशी माहितीही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply