रायगड किल्ला आणि परिसर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद

महाड (जि. रायगड) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड किल्ला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेचा कारणास्तव रायगड किल्ला, रायगड रोपवे व परिसर पर्यटकांसाठी ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक जनसंपर्क कार्यालयाकडून यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी रायगड किल्ल्यावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने रायगड किल्ला ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२१ या पाच दिवसांच्या कालावधीत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड किल्ल्याबरोबरच किल्ल्यावर जाण्यासाठी सुविधा पुरवणारा रोपवेदेखील पर्यटकांसाठी या कालावधीत बंद राहणार आहे. रायगडच्या आजूबाजूचा परिसरातदेखील पर्यटकांसाठी प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी महाड नाते खिंड ते पाचाड तसेच माणगाव येथून जाणारा माणगाव , घेरोशी वाडी मार्गे पाचाड हे दोन रस्ते पर्यटक वापरत असतात. राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव या दोन रस्त्यांवरील वाहतूकदेखील पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे.

या कालावधीमध्ये रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आगाऊ सूचना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply