रत्नागिरीत बालदोस्तांसाठी शुक्रवारी कट्टीबट्टीचा प्रयोग

रत्नागिरी : ठाण्याच्या गंधार संस्थेचा “कट्टीबट्टी” हा लहान मुलांच्या आविष्काराचा प्रयोग रत्नागिरीत येत्या शुक्रवारी (दि. १७ डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात संध्याकाळी ६ वाजता हा प्रयोग होणार आहे.

अग्गोबाई ढग्गोबाई… सारखे धम्माल बडबड गीत, चार दिवस वाट पाहण्यात गेलेसारख्या कवितेतील कष्टकऱ्यांच्या जगण्याचा संघर्ष. निसर्ग, मानव, भावभावना, बोली आणि कवितेला लावलेल्या सुंदर चाली असा मराठी बालभारतीच्या पुस्तकातील कवितांचा रंगमंचावरील आविष्कार असलेला हा “कट्टीबट्टी” कार्यक्रम आहे. ठाण्यातील गंधार या संस्थेतर्फे बालनाट्य आणि त्यासाठीचे शिबिरे आयोजित करून बालरंगभूमीवरील विविध उपक्रम राबविले जातात. याच संस्थेतर्फे कट्टीबट्टी हा कार्यक्रम सादर केला जातो. त्यामध्ये ४० बालकलाकारांचा समावेश असून काव्यवाचन, गायन आणि नृत्य असा हा दोन तासांचा कार्यक्रम आहे. दप्तराचे ओझे वाटणारी मुले, पुस्तक न वाचणारी मुले यांना पुस्तकांची गोडी लागावी, तसेच त्यांच्या पालकांना शालेय जीवनातील आठवणीत रमता यावे असा हा आविष्कार आहे. पत्रकार प्रशांत डिंगणकर यांची ही संकल्पना असून प्रा. मंदार टिल्लू यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. संगीतकार ओंकार घैसास आणि वैभव पटवर्धन यांनी संगीत संयोजन केले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम मुल सादर करतात. वाद्य, काव्यवाचन, निवेदन, सुत्रसंचालन, गायन, नृत्य करणारी मुले चौथी ते दहावीतील आहेत. त्यांचा हा आविष्कार पाहताना प्रेक्षक भारावून जातात. शीतल तळपदे यांची प्रकाशरचना, प्रकाश निमकर यांची वेषभूषा, प्रसाद वालावलकर यांची रंगभूषा प्रयोगाला लाभली आहे.

दादरच्या शिवाजी मंदिर येथे हाऊसफुल्ल.प्रतिसादात १७ ऑगस्ट २०१९ रोजी कट्टीबट्टीचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर गिरगाव, ठाणे, बोरिवली, खोपोली, कोल्हापूर, अंधेरी येथे आतापर्यंत १५ प्रयोग झाले. आता दिवाळीच्या निमित्ताने कट्टीबट्टीचा पडदा पुन्हा उघडला असुन रत्नागिरीत सोळावा प्रयोग होणार आहे, दत्ता केळकर यांनी हा प्रयोग रत्नागिरील प्रेक्षकांना उपलब्ध करून दिला आहे.

हा प्रयोग ना नफा ना तोटा तत्त्वावर केला जातो. यातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांना मानधन दिले जात नाही. केवळ प्रयोगाचा खर्च केला जातो त्यातून उरलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपयांचा धनादेश आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला, असे व्यवस्थापक बाळकृष्ण ओढेकर यांनी सांगितले.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply