आज (१४ डिसेंबर २०२१) मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि ज्ञान देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला, असं मानलं जातं. त्यामुळेच हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. झोंपाळ्यावरची गीता ही १०० वर्षांपूर्वी कवी अनंततनय यांनी बालसुलभ मराठीत केलेली रचना आहे.
मानवी जीवनाचं सार सांगितलेला श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ जाणून घ्यायचे, अभ्यासायचे प्रयत्न युगानुयुगे सुरू आहेत; मात्र प्रत्येक वेळी गीता वाचताना, अभ्यासताना त्यातील नवे अर्थ, त्याचे वैविध्यपूर्ण पैलू, पूर्वी न कळलेले आयाम समोर येतात, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. संस्कृत अर्थात गीर्वाणवाणीतलं हे ज्ञान सर्वांना उमजावं, याकरिता विनोबांनी सुगम मराठीत गीताईची रचना केली आणि ती घराघरात पोहोचली; मात्र त्याआधीही गीतेतलं तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या मराठी भाषेत मांडलं होतं ते दत्तात्रेय अनंत आपटे अर्थात अनंततनय यांनी. त्यांनी इसवी सन १९१७मध्ये म्हणजे आजपासून १०४ वर्षांपूर्वी ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही रचना त्यांनी केली होती.
पूर्वी मुलींची लग्नं वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झुले (झोपाळे) बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी गीता म्हटली तर लहान वयात त्यांना चांगलं ज्ञान मिळू शकेल, तसंच त्या मुली त्यांच्या पुढच्या पिढीवर ते संस्कार करू शकतील, असा विचार पुढे आला; पण संस्कृतातली गीता म्हणणं तसं अवघड होतं. त्यामुळे गीतेची अत्यंत सोप्या भाषेत रचना करून त्याला ‘झोंपाळ्यावरची गीता’ असं नाव दिलं गेलं.
अनिकेत कोनकर यांना त्यांचे आजोबा कै. बा. के. करंबेळकर गुरुजी यांच्या संग्रहात २०१०मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही दुर्मीळ पुस्तिका सापडली. त्यातली लेखकाच्या नावासह काही पानं गहाळ झालेली होती. वृत्तपत्रात लेख, स्वतंत्र वेबसाइटनिर्मिती आदी माध्यमांतून लोकांना आवाहन करून ती गहाळ पानं शोधण्यात यश आलं. त्यामुळे अनंततनय यांनी ती रचना केल्याचं समजलं. (दिवंगत) बालसाहित्यकार सरिता पदकी यांनी त्यांच्या संग्रहातून ती पानं उपलब्ध करून दिली. त्यानंतर ती गीता वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली. एक ऑगस्ट २०१५ रोजी सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) ‘झोंपाळ्यावरची गीता’ पुस्तकरूपानं प्रकाशित करण्यात आली. हे पुस्तक जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावं म्हणून त्याची किंमत अवघी ६० रुपये ठेवण्यात आली आहे. (पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क क्रमांक शेवटी दिला आहे.)
त्यापुढचा टप्पा म्हणून २०२०-२१ मध्ये झोपाळ्यावरच्या गीतेचा इंग्रजी अनुवाद करण्यात आला. मराठीसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले रत्नागिरीतले व्यासंगी पत्रकार, लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना झोपाळ्यावरची गीता वाचल्यानंतर तिचा इंग्रजीत अनुवाद करावा, असं प्रकर्षानं वाटलं.
अनंततनय यांनी केलेली झोपाळ्यावरच्या गीतेची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिला गेयता तर आहेच; पण भाषा सोपी असली, तर कमी शब्दांत बराच अर्थ सांगणारी आहे. विनोबांची गीताई हा श्रीमद्भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद आहे. झोंपाळ्यावरची गीता मात्र समश्लोकी नाही. त्यातल्या अध्यायांची श्लोकसंख्या मूळ संस्कृत श्लोकांपेक्षा काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी जास्त आहे. गीतेत ७००, तर झोंपाळ्यावरच्या गीतेत ५४६ श्लोक आहेत. मराठी भाषेचं सौंदर्य वेगळ्या पद्धतीनं यातून प्रतीत झालं आहे.
श्री. मसुरकर यांच्या अनुवादाच्या या कल्पनेचं स्वागत करून, २०२० साली गीताजयंतीचा मुहूर्त साधून झोंपाळ्यावरच्या गीतेचे काही श्लोक आणि त्यांचा इंग्रजी अनुवाद दररोज कोकण मीडियाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. २५ डिसेंबर २०२० ते ११ मे २०२१ या कालावधीत हा अनुवाद प्रसिद्ध झाला. अभ्यासाला सोपं व्हावं म्हणून मूळ गीतेचे श्लोकही सोबत देण्यात आले. गीतेचं आध्यात्मिक महत्त्व अद्वितीय आहे; मात्र हा केवळ आध्यात्मिक उपक्रम म्हणून नव्हे, तर भाषा अभ्यासाचा उपक्रम म्हणूनही राबवण्यात आला. संस्कृत, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांच्या सौंदर्याचा आस्वाद यातून घेता येणार आहे. सर्वांना हा उपक्रम आवडेल, याची खात्री आहे. अधिकाधिक व्यक्तींपर्यंत हा ठेवा पोहोचवण्यासाठी वाचकही हातभार लावतील, अशी आशा आहे. https://www.facebook.com/ZopalyawarchiGeeta या फेसबुक पेजवर इंग्रजी अनुवादासह झोंपाळ्यावरची गीता उपलब्ध आहे.
झोंपाळ्यावरची गीता हे पुस्तक आणि ई-बुक आत्ताही विक्रीला उपलब्ध आहेच. त्याशिवाय राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादासह झोंपाळ्यावरची गीता पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा मानस आहे.
- संपादक, कोकण मीडिया/सत्त्वश्री प्रकाशन
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी https://wa.me/919850880119 या व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक करून मागणी नोंदवावी. मोबाइल : 9423292162)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

झोपाळ्यावरची गीता
झोंपाळ्यावरची गीता
रचना : अनंततनय
संकलन : अनिकेत कोनकर
प्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन…