रत्नागिरी : सोडावॉटरच्या काचा किंवा बहिर्गोल भिंगाप्रमाणे जाड काचांच्या चष्मा वापरताना खूपच त्रास सोसावा लागतो. हा त्रास अनेकांना होत असतो. पावस (ता. रत्नागिरी) येथील सुधीर नागेश विश्वासराव गेल्या ३७ वर्षांपासून अशा प्रकारचा चष्मा वापरत होते. हा चष्मा आपल्याला आयुष्यभर वापरावा लागणार, असेच त्यांना वाटत होते. परंतु इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने त्यांना नवी दृष्टी दिली. दोन्ही डोळ्यांवरील शस्त्रक्रियेनंतर चष्म्याचा नंबरही खूपच कमी झाला असून सामान्य लोकांप्रमाणे ते चष्मा वापरू लागले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे सड्यावर राहणारे श्री. विश्वासराव म्हणाले, मिळंद (ता. राजापूर) हे माझे मूळचे गाव आहे. लहानपणीच मला दृष्टीची समस्या उद्भवली होती. माझ्या मोठ्या भावालाही समस्या होती. लहानपणापासून नजर कमकुवत असल्यामुळे सुरवातीला मुंबईत तपासणी केली. कोणताही ठोस उपाय नव्हता. १९८५ मध्ये मुंबईतील नॅब सेंटरमध्ये तपासणी केली. तेथे नजर स्थिर राहण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा चष्मा देण्यात आला. यामुळे दैनंदिन जीवनात स्वतःचे काम स्वतः करता येऊ शकेल इतपत व्यवस्था झाली. त्यावेळच्या नेत्रतज्ज्ञाने सांगितले की, हा चष्मा कायमस्वरूपी वापरावा लागेल. चष्म्याचा नंबर बदलला नाही. २८ व ३२ असे दोन डोळ्यांचे नंबर होते. अखेर त्याच परिस्थितीत गेली ३७ वर्षे मी दैनंदिन व्यवहार करीत होतो.
श्री. विश्वासराव यांना पत्रकार मित्र मकरंद पटवर्धन यांच्याकडून रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलची माहिती मिळाली. तेथे तपासणी करायचा निर्णय घेतला. इन्फिगोमध्ये तपासणी केली. तेथे मला आणि नातेवाइकांना सर्व योग्य माहिती देण्यात आली. सर्व तपासण्या केल्यानंतर डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, असे सांगून श्री. विश्वासराव म्हणाले, डॉ. श्रीधर ठाकूर यांनी लगेचच तपासण्या, लागणारी लेन्स यांची माहिती दिली. दोन्ही डोळ्यांवर एक महिन्याच्या फरकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. नियमित तपासण्या, शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी, डॉक्टरांनी दिलेले आयड्रॉप्स, गोळ्या आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे घरच्यांनीही खूप काळजी घेतली. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांत नवीन चष्मा बनवून घेतला. आता जाड भिंगाचा नव्हे तर अत्यंत कमी नंबरचा साधा चष्मा मी वापरू लागलो आहे. हे जग सुंदर आहेच, पण ते आपण पाहू शकतो आणि जाड भिंगाचा चष्मा जाऊन डोळेही सुखद अनुभव घेत आहेत, याची जाणीव झाली.
केवळ इन्फिगो आय केअर हॉस्पिटलद्वारे डॉ. ठाकूर यांनी रत्नागिरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण केल्यामुळे हे शक्य झाले. अन्यथा पुणे, कोल्हापूर आणि मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन शस्त्रक्रिया करून घेणे आम्हाला परवडले नसते, असे श्री. विश्वासराव यांनी सांगितले.
हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी सांगितले की, जाड भिंगाचा चष्मा असलेल्या रुग्णांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. श्री. विश्वासराव यांनाही तो होता. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांच्या उजव्या डोळ्याचा नंबर २८ व डाव्या डोळ्याचा ३१ होता. शस्त्रक्रियेनंतर उजव्याचा २.० आणि डावा १.० एवढा खूपच कमी झाला. यामुळे त्यांना डोळ्याला आराम मिळाला आहे. त्यांच्याकरिता विशेष लेन्स इन्फिगो आय केअरने बनवून घेतली. रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. माझे मूळ गाव लांजा, रत्नागिरी असून येथे डोळ्यांविषयी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.