दररोज १३ सूर्यनमस्कार घालून साजरा करा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

रत्नागिरी : दररोज १३ सूर्यनमस्कार घालून ७५ कोटी सूर्यनमस्काराच्या संकल्पात सहभागी होतानाच भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची एक अनोखी संधी पतंजली योगपीठाने उपलब्ध करून दिली आहे.

हरिद्वार येथील पतंजली योगपीठ, गीता परिवार, क्रीडा भारती, हार्टफुलनेस संस्था, नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ७५ कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्याकरिता रत्नागिरी जिल्ह्याचीही समिती स्थापन करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पतंजली योगपीठासह पाच संस्थांनी केला आहे. याद्वारे विश्वविक्रम घडवून इतिहास रचण्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम योजिला आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेश सरकार, केंद्र सरकारचे आयुष आणि क्रीडा मंत्रालयाने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय स्तरावरील अन्य संस्थांनाही यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंचाहत्तर कोटी सूर्यनमस्कारांच्या माध्यमातून युवाशक्तीला योग, आरोग्य आणि राष्ट्रप्रेम यामध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमाच्या संकेतस्थळाच्या अनावरणाचा कार्यक्रम मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते हरिद्वार येथे पतंजली योगपीठात झाला. त्यावेळी स्वामी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण महाराज तसेच अन्य संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.

संकल्पामधअये भाग घेण्यासाठी www.75suryanamaskar.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावयाची आहे. नोंदणी वैयक्तिक, कार्यकर्ता, संस्थांनाही करता येईल. हा कार्यक्रम १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये चालणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने ३८ दिवसांपैकी किमान २१ दिवस रोज किमान १३ सूर्यनमस्कार घालावयाचे आहेत. किमानपेक्षा कितीही जास्त दिवस आणि कितीही जास्त सूर्यनमस्कार क्षमतेप्रमाणे घालता येतील. किमान कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

संस्थांची नोंदणी करताना वेबसाइटवर या कार्यक्रमात सहभागी होत असल्याबद्दलचे पत्र संस्थेचे लेटरहेडवर दिलेल्या नमुन्यात आणि संस्थेच्या प्रमुखांच्या सहीने अपलोड करणे आवश्यक आहे. सहभागी होणाऱ्या सर्वांची एक्सेल फॉर्मेटमध्ये यादी जोडणे आवश्यक आहे. संस्थेच्या प्रमुखांनाही प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जास्त सहभाग देणाऱ्या संस्थेला संस्था चषक देण्यात येईल.

या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती, संभाव्य प्रश्नांची उत्तरेही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती नेमण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष विद्यानंद जोग (पतंजली समिती), सचिव विनय साने (पतंजली योगपीठ), सदस्य विश्वनाथ बापट (क्रीडा भारती), नेत्रा राजेशिर्के (क्रीडा भारती), राजेश आयरे (योगशिक्षक शिर्के प्रशाला), किरण जोशी (योगशिक्षक, जीजीपीएस स्कूल) हे सदस्य आहेत. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक, अन्य संस्था, व्यक्तींनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply