तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांवर विकास योजनांची जाहिरात

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांवर राज्य शासनाच्या विविध योजनांची जाहिरात रंगविण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबलेल्या या जाहिराती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात आल्या.

गेल्या दोन वर्षांत राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेच्या डब्यांचा वापर करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून दादर-सावंतवाडी (तुतारी एक्स्प्रेस) या गाडीची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ या मोहिमेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात करण्यात आलेल्या विविध कामांचा उल्लेख करण्यात आला आहे.

तुतारी एक्स्प्रेस सकाळी खेड येथे ४ वाजून १० मिनिटांनी, सकाळी पावणेपाच वाजता चिपळूण रेल्वेस्थानकात दाखल झाली. सावर्डे (सकाळी ५ वाजता), आरवली (५.२० वाजता), तर रत्नागिरी रेल्वेस्थानक (सकाळी पावणेसात वाजता) ही गाडी आली. लोकहिताच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. यावर्षी प्रथमच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस, मुंबई-लातूर एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मिरज मार्गे धावणारी कोल्हापूर-मुंबई कोयना आणि कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा त्यात समावेश आहे.

‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ हे घोषवाक्य घेऊन विविध लोकापयोगी योजनांचा अतिशय समर्पक संदेश रेल्वे गाड्यांच्या डब्यांवर करण्यात आला आहे. शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, मोफत सातबारा, ई-पीक पाहणी यासह विविध योजनांचा यात समावेश आहे. राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी येत्या १ मार्चपर्यंत ही जाहिरात प्रदर्शित केली जाणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply