मंडणगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या शनिवारी, १२ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात आंबडवे (ता. मंडणगड) या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाला भेट देणार आहेत. आंबडवे गावाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहेत.
यापूर्वी गेल्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी राष्ट्रपती आंबडवे गावाला भेट देणार होते. मात्र त्यावेळी त्यांचा दौरा रद्द झाला होता. आता ते येत्या शनिवारी आंबडवे येथे येणार आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा सुरळित होईल, असा विश्वास रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंडणगड येथे व्यक्त केला. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व तयारी जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाने आणि इतर विभागांनी केली आहे. त्याचा आढावा घेतल्यानंतर डॉ. गर्ग बोलत होते.
ते म्हणाले, राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त विलास पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा, राजशिष्टाचार विभागाने योग्य ती सज्जता केली आहे. रस्ते तसेच इतर दृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य विभाग आणि इतर शासकीय विभाग दिलेली जबाबदारी तंतोतंत पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.
राष्ट्रपती पहिल्यांदाच आंबडवे येथे येत असून हा त्यांचा दौरा शांततेत आणि सुरळीत पार पडण्याची दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि इतर विभागांसह नागरिकांचीही मोठी जबाबदारी आहे. नागरिक, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीही हा दौरा शांततेत आणि सुरळित पार पडण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड