चिपळूण : वणव्यामुळे कोकणात मोठी हानी होते. त्यामुळे वणवा लागूच नये म्हणून प्रयत्न व्हायला हवेत, असे मत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.

‘सह्याद्री निसर्ग मित्र’च्या वणवामुक्त कोकण समितीतर्फे चिपळूण पंचायत समितीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जनजागृती आणि पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘वणवामुक्त कोकण’तर्फे सुरू असलेले प्रयत्न सामाजिक बांधिलकीचा भाग आहेत. ते अभिनंदनीय आहेत. एका बाजूला हे काम होत असताना गावातल्या लोकांनीही यात पुढाकार घ्यायला हवा आहे. वणव्याचे दुष्परिणाम कोकणात अनेकांनी भोगलेले आहेत. पूर्वी सह्याद्री संस्थेच्या कॉलेजमध्ये शिकणारे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी वणवा विझवण्यासाठी योगदान करायचे. विजेच्या लाइनमुळेही वणवा लागत असतो, असा अनुभव आहे. वणव्याची आग सुमारे तीसेक फूट जीभ टाकून पुढे जात असते. त्यामुळे वणवे लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्यासाठी प्रयत्न करताना कोकणातील गवताचा कसा उपयोग करत येईल ते पाहायला हवे आहे.

यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती रिया कांबळे, उपसभापती प्रतापराव शिंदे, पंचायत समिती सदस्य पांडुरंग माळी, सुनील तटकरे, राकेश शिंदे, नितीन ठसाळे, वन अधिकारी श्रीमती कीर, वणवामुक्त कोकणचे अध्यक्ष श्रीराम रेडीज, सचिव भाऊ काटदरे आदी उपस्थित होते. उपसभापती प्रतापराव शिंदे यांनी पर्यावरणाच्या या गंभीर प्रश्नावर उपाययोजना शासनाने सांगायला हव्यात, असे म्हटले. लाकूडतोड कोण थांबवणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या पूर्वजांनी दारिद्र्य सहन करून जमिनी, झाडे तोडली नाहीत. मग आम्ही का तोडतो, असाही प्रश्न विचारला. यावेळी उद्योजक वसंत उदेग यांच्यासह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. वणवामुक्तीसाठी वन खात्याने पुरस्कार जाहीर करावा, दुसऱ्याची बाग जाळण्याची मानसिकता कमी व्हावी, वणव्याची चौकशी व्हावी, वणवा लावणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, वणव्याची पहिली माहिती देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान व्हावा, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
प्रास्ताविकात प्रवीण कांबळी यांनी, शेती दुर्लक्षित करून विकास साधला जाणार नाही, असे म्हटले. त्यांनी वणवामुक्त कोकणची माहिती दिली. जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांनी, गेली तीस वर्षे चिपळूणला हे काम सुरू असून आज निसर्ग वाचविण्यासाठी मानवी पुढाकाराचा वणवा लागला असल्याचे म्हटले. वणव्यामुळे निसर्गाची हानी होते. मधमाश्या संपल्या तर माणूस संपेल, अशा अनेक कारणांमुळे वणवा रोखायला हवा असल्याचे नमूद केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कळवंडे, पाचाड, रेहेळ ग्रामपंचायतींना अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांनी सन्मानपत्र, मानचिन्ह, निसर्गग्रंथ, सीलिंग फॅनसह आदर्श गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वणवामुक्तीच्या कामात योगदान असलेल्या खेर्डी, धामणवणे, टेरव, कामथे, कापसाळ, कळंबस्ते, वालोपे, पेढे, परशुराम, कालुस्ते, मिरजोळी, शिरळ, धामणदेवी ग्रामपंचायती, वणवामुक्त समिती, पाचाड, बाळ महादेव खेडेकर, शुभम दीपक खेडेकर, कृषिरत्न पुरस्कार प्राप्त दिनेश दळवी (वालोटी), मंदार ठसाळे (धामेली), अमित महाडिक (कापसाळ) आदींना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वणवामुक्त कोकणचे कार्याध्यक्ष प्रकाश(बापू) काणे यांनी केले. पुरस्कार सोहळयाचे सूत्रसंचालन विलास महाडिक यांनी केले. धीरज वाटेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड