संस्कृतमधील संस्कारांचे बीज पालकांनी मुलांमध्ये रुजवावे : विजय वाडिये

रत्नागिरी : संस्कृत सुभाषित पठण स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सत्त्व आणि स्वत्व जागृत झाले. संस्कृतमधील संस्कारांचे बीज रुजण्यासाठी पालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संस्कृतप्रेमी विजय वाडिये यांनी केले.

संस्कृत भारतीच्या कोकण प्रांत रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित संस्कृत सुभाषित पठण स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, संस्कृत सुभाषित स्पर्धा खूपच आनंददायी आहे. संस्कृत सुभाषितांमुळे माणसाला आनंद मिळतो. मनाला प्रसन्नता लाभते. आनंद आणि सुख हे वेगवेगळे आहे. संस्कार ही देण्याची गोष्ट नाही. मुलांवर मोठ्यांच्या कृतीतून लहान वयात संस्कार होत असतात. बुद्धी, प्रज्ञा, मेधा यांची वृद्धी होण्याकरिता संस्कृत महत्त्वाचे आहे. चांगल्या संस्कारासाठी आणि मुलांना आकाशात भरारी मारताना प्रोत्साहन द्यावे. परंतु मागतील त्या सर्व गोष्टी आणून देऊ नयेत.

स्पर्धा २३ जानेवारीला ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. पाचवी ते नववीच्या २०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ७ विद्यार्थ्यांची पैकीच्या पैकी म्हणजे १०० सुभाषिते पाठ होती. त्यांना सन्मानित केले. विजेत्या विद्यार्थ्यांसह सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन सन्मानित केले. वितरण समारंभाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण आणि कोकण प्रांत शिक्षण सहप्रमुख आशीष आठवले, विनीता मयेकर, रत्नागिरी नगर संयोजिका अक्षया भागवत आदी उपस्थित होते. विजेती अनिशा आंबेकर म्हणाली की, सुभाषितांचे पाठांतर अर्थ समजून घेत केल्यामुळे या सुभाषितांचा व्यावहारिक जीवनाशी संबंध आहे. त्याचे आचरण केले पाहिजे, हे जाणवले. सुभाषितांमुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण होते, मन उत्साही होते. संस्कृत पठणाने वाणी शुद्ध होते, उच्चार स्पष्ट होतात. पालक शिक्षिका भक्ती खांदारे म्हणाल्या की, मुलाला संस्कृत पाठांतराची सवय झाली. ही स्पर्धा म्हणजे सुवर्णपर्वणी म्हणावी लागेल. परीक्षक वैशाली हळबे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्कृत ही एका समाजाची भाषा नाही, यात विविध जातीधर्मांचे विद्यार्थी सहभागी झाले आणि संस्कृत भारती चांगल्या प्रकारे संस्कृतचा प्रचार करत आहे, याबद्दल कौतुक केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक अनिल चव्हाण म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात संस्कृत कानी पडल्याने खूपच आनंद झाला आहे. संस्कृत ही चैतन्याने ओतप्रोत भरलेली भाषा आहे. विद्यार्थ्यांनी सुभाषिते चांगल्या पद्धतीने पाठ केली. संस्कृतचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत असतो.

कोकण प्रांत शिक्षण सहप्रमुख आशीष आठवले म्हणाले की, एकाच चालीत म्हणता येतील अशी दोन ओळींची १०० सुभाषिते दिली होती. मुलांना पाठांतराची सवय लागावी हा स्पर्धेचा हेतू होता. रोज एक सुभाषित अर्थासह जाणून घेतले व पाठ केले.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अंजू वाडिये, अक्षया भागवत, वैशाली हळबे आणि प्रतिभा प्रभुदेसाई यांनी यांनी काम पाहिले. तेजश्री जोशी हिने सूत्रसंचालन केले. सुभाषित अभियान प्रमुख विनीता मयेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुरवातीला विद्यार्थ्यांनी सुभाषित पठण केले. यावेळी देणगीदारांचे विशेष आभार संयोजिका अक्षया भागवत यांनी मानले.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply