चिपळूणच्या वाचनालयात अप्पासाहेब जाधव यांचा पुतळा

चिपळूण : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात स्वर्गीय अरविंद तथा आप्पासाहेब जाधव यांच्या पुतळ्याचे अनावरण चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले.

अनावरणाचा क्षण आयुष्यातील भाग्याचा आहे. स्वर्गीय अप्पांनी खासगीत स्वर्गीय माजी खासदार, शिक्षणमहर्षी निकम साहेबांनाही आपुलकीने सल्ले दिले होते. अप्पांची सहनशीलता, सामाजिक जीवनात व्यक्त होण्याची पद्धती अनुकरणीय होती. अप्पांचे काम मोठे होते, हे काम तरुणांना कळणे महत्वाचे आहे. यातून तरुणाईने बोध घ्यायला हवा आहे. सामाजिक जीवनात कार्यरत असताना विश्वस्त कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण अप्पा होते अशा भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केल्या. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी आमदार रमेशभाई कदम, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर होते. श्री. निकम यांच्या हस्ते अप्पांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. पुतळ्याचे शिल्पकार संदीप ताम्हणकर यांचा श्री. निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार श्री. कदम म्हणाले, अप्पांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. अप्पांना मी अनेकदा चालत वावरताना पाहिले आहे. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा १९८४ साली अप्पांनी अभिनंदनाचे पोस्टकार्ड पाठवून दोन सल्ले दिले होते. अप्पांचे दोन्ही सल्ले मी आजही आवर्जून पाळतो. अप्पांची राजकीय विचारसरणी कधीही पुढे आली नाही. योग्य वेळी अप्पा सामाजिक कामातून स्वतःहून बाजूला झाले. सामाजिक काम करण्यासाठी घरच्यांची साथ लागते, अप्पांना ती मिळाली. शहरातील दूरदर्शनची इमारत वाचनालयासारख्या संस्थेला मिळायला हवी आहे. त्या इमारतीत वाचनालयाला आपले प्रकल्प कार्यान्वित करता येतील. यासाठी आपण सर्वांनी भविष्यात प्रयत्न करू या, असेही यावेळी कदम म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय चितळे यांनी केले. वाचनालयाच्या बैठकांमध्ये अप्पांची आठवण निघते. पुस्तक देवघेव करणाऱ्या संस्थेत पुतळे कोठून आले, याचे विवेचन करताना चितळे म्हणाले, स्मरण ठेवून पुढे जाणे हे आपले काम आहे. त्यांनी वाचनालयाचे यापूर्वीचे अध्यक्ष रघुवीर ऊर्फ तात्या कोवळे, धुरी सर, ज्येष्ठ कवी अरुण इंगवले आदी माजी अध्यक्षांच्या आठवणी जागवल्या. वाचनालय आज आपल्या कुटुंबप्रमुखाचे स्मरण करत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

कीर्तनकार अंजली साने म्हणाल्या, ‘अप्पा अजातशत्रू होते. ते अखंड कार्यरत राहिले. अप्पांनी कधी मोठेपणा मिरवला नाही. आपल्या कामावर मनापासून प्रेम केले. त्यांच्या कार्यात पत्नीचे पाठबळ महत्त्वाचे होते. वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली असावी, म्हणून डॉ. यतीन जाधव यांनी सुरू केलेले ‘अपरांत’ हे अप्पांचे स्वप्न होते. या उपक्रमातून वाचनालयाची व्यक्तीप्रतिची कृतज्ञता जाणवत असल्याचे त्या म्हणाल्या.

कवी राष्ट्रपाल सावंत, वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय बापट यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले, तर आभार मनीषा दामले यांनी मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply