वसई : आमची वसई या समाजसेवी संस्थेने तरुणांच्या श्रमदानातून वसई किल्ला, भुयारी मार्ग आणि नागेश महातीर्थ येथे स्वच्छता मोहीम राबवली.
स्कंद पुराणात उल्लेख असलेले श्रीनागेश महातीर्थ, पोर्तुगीजांच्या शासनाचा आणि जुलमाचा तसेच मराठा सैन्याच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या वसई किल्ल्यात देशविदेशातून रोज शेकडो लोक भेट देतात. गेली २ वर्षे लॉकडाउनमुळे पर्यटन क्षेत्रे बंद होती. हळूहळू निर्बंध शिथिल होत आहेत. पुन्हा पर्यटनक्षेत्रे खुली होत आहेत.
गड-किल्ले आणि निसर्ग आनंद लुटण्यासाठी, शिकण्यासाठी आणि पुढील पिढीला जसेच्या तसे देण्यासाठी असतात. पण लोक आनंदाच्या भरात किंवा अज्ञानामुळे अशी सुंदर आणि ऐतिहासिक स्थळे अस्वच्छ करून जातात. स्वकृतीतून आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आपला ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला जसाच्या तसा मिळावा, या उदात्त हेतूने “आमची वसई” सातत्याने काम करत असते. त्याअंतर्गत नैसर्गिक, ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र रक्षणाचा प्रयत्न “आमची वसई” सामाजिक संस्था गेल्या १० वर्षापासून निष्ठेने आणि श्रद्धेने करत आहे.
“किल्ल्याचे संवर्धन व्हावे, शासनाने वेळीच डागडुजी करावी, हे खरेच पण पर्यटकांनीदेखील किल्ल्याचे सांस्कृतिक मूल्य जपावे ही अपेक्षा आहे. किल्ल्यात सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांनी स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अनेक लोक जाताना उरलेले अन्न, प्लास्टिक डिशेस, पेले, पाण्याच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, बेफिकीरपणे इतस्ततः फेकून निघून जातात, शासन व स्वयंसेवी संघटना किती काम करणार? आपण जागरूक नागरिक म्हणूनदेखील आपली जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे”, असे मत धर्मासभेचे सचिव व आमची वसई चे संस्थापक पं. हृषीकेश वैद्य गुरुजी यांनी व्यक्त केले.
संस्थेने आज “आझादी का अमृतमहोत्सव” अंतर्गत केंद्रीय पुरातत्त्व विभाग व आमची वसई यांच्या संयुक्त विद्यमाने पं. वैद्य गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुर्गमित्र पुरुषोत्तम देवधर यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम पार पडली. आमची वसईच्या ७५ युवकयुवतींनी वसई किल्ला, भुयारी मार्ग व नागेश महातीर्थ येथे स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी पुष्कराज करंदीकर, रुग्णमित्र राजेंद्र ढगे, प्रमोद दवे, विनोद चोपडेकर, मनीष मकवाना, मनोज मोरे, आशीष ठठेरा, केशव भावसार, भूपेश पाटील, नितीन वानखेडे, राहुल घोष, हिम्मत घुमरे, देवेंद्र गुरव, मनोज मोरे, धर्मासभा सदस्य अक्षय वर्तक, निनाद सहस्रबुद्धे, महिला सदस्य रोशनी वाघ, निर्मला कामत, राष्ट्रीय महिला मॅरेथॉन धावपटू मिनाज नडाफ, क्षिप्रा कामत, वैष्णवी भट व मधुबाला सिंह आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कार्यालयाने मोलाचे कार्य केले.
(गुरुदत्त वाकदेकर)
