चिपळूण : वैभवशाली इतिहास जागविण्यात पोवाड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे शाहीर शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्राचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या सहकार्याने ‘अपरान्तायन’ ही दृक्श्राव्य मालिका सुरू केली आहे. मालिकेच्या चौथ्या दिवशी साहित्य आणि नाट्यक्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेली ‘वीररसाची बोली’ म्हणजेच पोवाडे या विषयावर शाहीर शिवाजी शिंदे यांच्याशी मसाप चिपळूण शाखेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कथाकार प्रा. संतोष गोनबरे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. शिंदे यांनी पोवाड्यांच्या इतिहासाचीही माहिती दिली. ते म्हणाले, पोवाडा हा शब्द संस्कृतमधून रूपांतरित झाला. ज्ञानेश्वरीतही उल्लेख पोवाड्यांचा उल्लेख आढळतो. वीरांचा पराक्रम, शौर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य, गुण, कौशल्ये यांचे काव्यात्म वर्णन, प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा होय. पोवाडा म्हणजे स्फूर्ती देणारे काव्य आहे. साधारण सतराव्या शतकात पोवाड्यांचा उदय झाला. पोवाड्यांमध्ये ऐतिहासिक घटना समोर ठेवून गीतरचना केली जाते. वेगळ्या धाटणीने लिहिलेली ही काव्ये मनोरंजनही होईल, अशा पद्धतीन गायिली जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ साली प्रतापगडावर अफझलखानाचा वध केला. अग्निदास यांनी शिवरायांच्या त्या कर्तृत्वाचा पोवाडा रचून गायिला. कवी तुळसीदास यांनी सिंहगड सर करणारा तानाजी मालुसरे, यमाजी भास्कर यांनी बाजी पासलकर यांचा पोवाडा रचला. पेशव्यांच्या काळातही राम जोशी, अनंतफंदी, होनाजी बाळा, शाहीर प्रभाकर असे अनेक शाहीर होऊन गेले. मात्र पोवाड्यांचे जतन पाश्चिमात्य हॅरी नावाच्या एका अभ्यासकाने केले. एस. टी. शालिग्राम इतिहासपुरुषांचे ६० पोवाडे मिळविले आणि त्यांचे पुस्तक १८९१ मध्ये प्रसिद्ध केले. मृतदेहालाही जिवंत करण्याचे सामर्थ्य असलेले वीररसयुक्त गीत म्हणजे पोवाडा, अशी व्याख्याही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितली.
श्री. शिंदे यांनी आपल्या पहाडी आवाजात काही पोवाडेही ऐकविले. चिपळूण नगरीचा पोवाडाही त्यांनी तयार केलेला पोवाडा त्यांनी ऐकविला. चिपळूण शहराचे नाव कसकसे बदलत गेले, याची रंजक माहिती या पोवाड्यात आहे. वीरपुरुषांच्या पराक्रमाची उजळणी करावी, कौतुके गावीत, इतिहास लिहावा, यासाठी वीररसयुक्त पोवाडे प्रवृत्त करतात, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
श्री. शिवाजी शिंदे यांच्याशी साधलेला संवाद सोबतचा व्हिडीओमध्ये पाहता येईल.