सुमित्राताई महाजन यांना ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार

चिपळूण : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारा अपरान्त भूषण पुरस्कार लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राताई महाजन यांना देण्यात येणार आहे.

कोकणच्या आरमाराचे वैभव ज्यांनी अनंतपरीने वाढविले, त्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्रीमंत रघुजीराव आंग्रे यांच्या हस्ते सुमित्राताई महाजन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा येत्या ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होईल.

वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्राचा हा पुरस्कार संस्थेचे माजी अध्यक्ष कै. अरविंद तथा अप्पा जाधव यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येतो. पहिला अपरान्त भूषण पुरस्कार नामवंत इतिहास संशोधक आणि डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे यांना देण्यात आला होता. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सुमित्राताईंची ६ जून २०१४ रोजी सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्या २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेच्या सभापती होत्या. सुमित्राताईंनी आपल्या कार्यकाळात लोकसभाध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यांना २०२१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने ठसा उमटविला आहे. साध्वी अहिल्याबाईंच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या नाटकाचा यात विशेष उल्लेख करावा लागेल. तसेच रामायण आणि महाभारत यावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. समस्त चिपळूणकरांना सुमित्राताईंबद्दल विशेष आदर आहे.

सुमित्राताई महाजन यांच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या कार्यावर श्रीमती मेधा किरीट यांनी ‘ताई’ हा ग्रंथ लिहिला आहे. आनंद लिमये यांनी प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे लोकार्पण ११ एप्रिलच्या कार्यक्रमात होणार आहे.

या कार्यक्रमाला चिपळूणचे मुख्याधिकारी-प्रशासक प्रसाद शिंगटे, लेखिका श्रीमती मेधा किरीट आणि प्रकाशक आनंद लिमये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघात ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply