चिपळूण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी मराठी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रेखा देशपांडे, तर उपाध्यक्षपदी नामवंत कवी आणि शाहीर राष्ट्रपाल सावंत यांची एकमताने निवड झाली आहे.

‘कोमसाप’ कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झाली. त्यावेळी कोमसापच्या बहुसंख्य सदस्यांच्या उपस्थितीत नव्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे आणि नामवंत कवी-समीक्षक अरुण इंगवले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. देशपांडे यांनी सांगितले की, ‘कोमसाप ही साहित्यिक चळवळ आहे. आधुनिक कवितेचे जनक केशवसुत यांचे मालगुंड येथील स्मारक आपले तीर्थक्षेत्र आहे. केशवसुतांची साकल्याचा प्रदेश ही विचारधारा मानून सर्व साहित्यिक संस्थांनी मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे.
इंगवले म्हणाले, मसाप आणि कोमसाप या संस्था एकाच गंगेला मिळतात. तेथे भेदाभेद असत नाहीत. आपण सर्वांनी हाच विचार घेऊन ही साहित्याची पालखी पुढे नेऊ या.

कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी समाजवादी विचारवंत सुनील खेडेकर, कार्याध्यक्ष मनीषा दामले, कार्यवाह अंजली साने, युवाशक्ती स्त्री विभाग प्रमुख अंजली बर्वे, पुरुष युवाशक्ती प्रमुख कैसर देसाई, जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रपाल सावंत, कार्यकारी सदस्य प्रकाश घायाळकर, विनायक ओक, स्मिता देवधर, रवींद्र गुरव, अभिजित देशमाने आणि महंमद झारे यांची तर सल्लागार म्हणून अरुण इंगवले आणि प्रकाश देशपांडे यांची निवड करण्यात आली.
कवी माधव आणि कवी आनंद यांच्या कवितांवर चिपळूण तालुक्यातील शाळांमधून कार्यक्रम करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. राष्ट्रपाल सावंत यांनी प्रकाश देशपांडे आणि अरुण इंगवले यांचे या शाखेला सदैव मार्गदर्शन लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड