पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृतीला बळ देण्याचे गाऱ्हाणे

रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुस्तकांची गुढी उभारून येथील जनसेवा ग्रंथालयाने वाचन संस्कृतीला बळ देण्याचे गाऱ्हाणे साहित्यपुरुषाला घातले.

‘बा म्हाराजा साहित्यपुरषा, जनसेवावाल्यांनी साहित्याची गुढी उभारलीली हाय.. पुस्तकांची पुंजा मांडलीली हाय.. साहित्यपुरषांच्या सानंवर आज उबं र्‍हावन गार्‍हानं घालतावं हाय.. बा म्हाराजा साहित्यपुरूषा, वाचनार्‍याला ढीगभर वाचयाची वानशा देस.. लिवनार्‍याच्या हातात ताकत देस.. बोलनार्‍याच्या तोंडारं सरस्वती नाचान दे.. लिवनार्‍याच्या लेकनेत साहित्याचो गोडवो दिसान दे.. इचारांचो तडको उडान दे… नावीन्याचो ध्यास लागान दे.. प्रतिभेची साथ मिलान दे.. लिवनार्‍यांची वंशवेल फलान दे.. फुलान दे.. असा सगला मंगल करून रत्नागिरीच्या साहित्याचा झेंडा जगबर मिरान दे रं साहित्यपुरषा म्हाराजा..’ असे खणखणीत गार्‍हाणे जनसेवा ग्रंथालयातर्फे उभारण्यात आलेल्या ‘साहित्यिक गुढी’ला घालण्यात आले. रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात, मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्यिक गुढीचा कार्यक्रम पार पडला.

विचार पताका
गुढीपाडव्यानिमित्ताने भरलेले ग्रंथप्रदर्शन

करोनानंतर वाचसंस्कृतीला आलेली मरगळ दूर होऊन ती वाढीस लागावी, साहित्य विश्वात नवनव्या, सकस साहित्याची निर्मिती व्हावी, या उद्देशाने गेली तीन वर्षे जनसेवा ग्रंथालय ‘साहित्यिक गुढी’ हा उपक्रम राबवीत आहे. करोनाचे निर्बंध शिथिल होताच यावर्षीही ग्रंथालयाच्या प्रांगणात साहित्यिक गुढीचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गुढी उभी करून तिला पुस्तकांची माळ बांधण्यात आली. गझलकार देवीदास पाटील यांच्या हस्ते गुढीची उभारणी करून पूजा करण्यात आली. साहित्य पताका हे या गुढीचे विशेष होते. जनसेवाचे कृतिशील वाचक श्रीनिवास सरपोतदार यांनी यावर्षी ‘भावगीते’ हा विषय घेऊन पताका साकारल्या होत्या. पताकांवर भावगीते आणि त्यांचे कवी यांचे सुलेखन करून या पताका साकारल्या होत्या.

ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांच्या हस्ते ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यानंतर संगमेश्वरी बोलीतील लेखक अमोल पालये यांनी खणखणीत आवाजात गुढीसमोर सार्‍यांच्या साक्षीने गार्‍हाणे घातले. साहित्यिक गार्‍हाण्यातून मराठी साहित्य परंपरेतील संत चक्रधरांपासून मराठीतील दिग्गज साहित्यिक, तसेच मराठीच्या बोलीभाषांना आवाहन करण्यात आले. वाचन चळवळ वाढीस लागावी, साहित्यात नवनिर्मिती व्हावी, वाचण्याची आवड निर्माण व्हावी, अशी भावना या गार्‍हाण्यातून व्यक्त करण्यात आली. ‘जनसेवावालं साहित्याची, पुस्तकांची, लोकांची शेवा करीत आलीलं हायतं. तेंच्या कारयात तेंनला यास देस.. वाचकांचो आशीरवाद भरभरानं मिलानं दे.. वाचकांचा पिरेम जनसेवाला लाभानं दे.. वाचकांचो आनी तेंचो गोडी-गुलाबीचो सवसार नांदू दे.. इचार-आचारांनी ती सगली मंडली यकटयं नांदून वाचन संस्कृतीची गुढी गगनात फडकानं दे रं साहित्यपुरषा म्हाराजा..’ अशी साद या गार्‍हाण्यातून घालण्यात आली.

गुढीनिमित्त ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ प्रवचनकार सु. द. भडभडे यांनी ‘संत एकनाथांची भारूडे आणि गौळणी’ या विषयावर विवेचन केले. जे लोकांमध्ये रूढ झाले ते भारूड अशी व्याख्या करत ‘अग अग विचू चावला.. सत्वर पाव ग मला..’ या भारुडांचे गायन करत भावार्थ समजून सांगितला. संत एकनाथ हे शांतीब्रह्म होते, हे सांगताना त्यामागील कथांचेही त्यांनी ओघवत्या शैलीत वर्णन केले.

कार्यक्रमाला कार्याध्यक्षा सुमित्रा बोडस, कार्यवाह राहुल कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य, श्रीनिवास सरपोतदार, वाचक, सभासद, साहित्य-वाचकप्रेमी उपस्थित होते. ग्रंथपाल सौ. सिनकर, सुजाता कोळंबेकर, सौ. भोसले, शिवानी सागवेकर, श्री. धोपटकर, ओंकार मुळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply