राजापूर : कोकणात नवीन फूल वनस्पतीच्या प्रजातीचा शोध सातत्याने लागत असतो. पण नवीन फूल वनस्पतीच्या गणाचा, वर्गाचा शोध लागणे क्वचितच घडते. अशाच एका कोथिंबीरवर्गीय वनस्पतीच्या गणाचा शोध राजापूर तालुक्यातील जांभ्या दगडाच्या पठारावर लागला आहे.

कोकणात बऱ्याच संशोधकांनी नवनवीन फुल वनस्पतींच्या प्रजातींचा शोध लावला आहे. महाराष्ट्रातून काही फूल वनस्पतीच्या प्रजातींचे नवीन गण म्हणून स्थापना केली आहे, परंतु अलीकडच्या शंभर वर्षांच्या कालावधीत नवीन गणाचा शोध लागलेला नाही. आता अशा प्रजातींमध्ये नवीन फूल वनस्पतींच्या गणाचा समावेश झाला आहे. राजापूर तालुक्यातील विखारे-गोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालय परिसरातून नवीन फुलवनस्पती गणाचा शोध लागला आहे. रयत शिक्षण संस्थेचे मोखाडा येथील महाविद्यालय आणि आबासाहेब मराठे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी देवीदास बोरूडे आणि त्यांच्या बरोबर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स कॉलेजमधील वनस्पतिशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी नीलेश माधव यांनी चार वर्षांच्या प्रयत्नानंतर हे संशोधन केले आहे.

नवीन गणाचे काही प्रमाणातील बाह्यरंग हिमालयातील चामाईसीअम (Chamaesium) या गणाशी साधर्म्य दाखवते. परंतु बऱ्याच बाह्यरंगाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या नवीन गणात एक प्रजातीचा समावेश केलेला आहे. या गणाचे नाव श्रीरंगिया (Shrirangia Gosavi, Madhav & Chandore) हे जगद्विख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ. श्रीरंग यादव, (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या नावावरून देण्यात आलेले आहे. प्रजातीचे नाव श्रीरंगिया कोन्क्नेन्सिस (Shrirangia concanensis Gosavi, Madhav & Chandore) असे आहे. श्रीरंगिया कोन्क्नेन्सिस हे नाव त्याच्या आढळाचे स्थान ‘कोकण’ या नावावरून देण्यात आले आहे. या नवीन वनस्पतीगणाचा शोधनिबंध जगविख्यात जर्नल नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी (स्वीडन) येथे अलीकडेच प्रकाशित झाला. या संशोधन कार्यात एमव्हीपी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. शरद कांबळे आणि डॉ. कांची गांधी (वरिष्ठ नामांकन रजिस्ट्रार, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, हर्बेरिया आणि लायब्ररी, केंब्रिज) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाचे संशोधनासाठी सहकार्य मिळाले.
या वनस्पतीचा आढळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जांभ्या दगडाच्या पठारावर झुडपाखाली आढळलतो. फुले व फळे येण्याचा कालावधी जून ते जुलै असा असतो. नवीन गणाचे बोटॅनिकल नाव श्रीरंगिया (Shrirangia Gosavi, Madhav & Chandore), तर बोटॅनिकल नाव श्रीरंगिया कोंकनेन्सिस (Shrirangia concanensis Gosavi, Madhav & Chandore) असे आहे. या वनस्पतीची उंची साधारणत एक फुटापर्यंत असते. नवीन प्रजाती ही कोथिंबीर कुळातील कंदवर्गीय आहे. फुले पांढऱ्या रंगाची छोटी असतात. फळे लंबगोलाकार लहान आहेत. फळांमध्ये दोन प्रकारच्या ग्रंथी (शिरा) आहेत.


