स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे वालावल येथे थाटात वितरण

वालावल (ता. कुडाळ) : येथील स्वरसिंधुरत्न परिवारातर्फे दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे वितरण येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात थाटात करण्यात आले. ऋचा संजय पिळणकर, देवयानी यशवंत केसरकर आणि मनोज भालचंद्र मेस्त्री यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कोकणातील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढीनिमित्ताने प्रतिवार्षिक धार्मिक कार्यक्रम पार पडले. कोल्हापूर येथील देवस्थान व्यवस्थापन समिती आणि वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण स्थानिक सल्लागार उपसमितीने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सायंकाळी स्वरसिंधुरत्न पुरस्कार विजेत्या
गायकांनी आषाढी एकादशीनिमित्ताने मंदिरात अभंग, भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर पुरस्कार वितरण पार पडले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांनी कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वरसिंधुरत्न स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी १३ मे रोजी जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ११ ते १६ वर्षे वयाच्या शालेय गटात ऋचा संजय पिळणकर, १७ ते ३५ वर्षे वयाच्या युवा गटात देवयानी यशवंत केसरकर आणि ३५ वर्षांवरील खुल्या गटात मनोज भालचंद्र मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावले. पहिल्या गटात भाविक गजानन मेस्त्री आणि श्रुती शरद सावंत यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. दुसऱ्या गटात विधिता वैभव केंकरे आणि हर्षल सगुण मेस्त्री यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक विजेत्यांना प्रत्येकी ३ हजार, तर तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. माणगावच्या वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धोंड, कणकवलीच्या भालचंद्र महाराज ट्रस्टचे व्यवस्थापक विजय केळुस्कर, श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचे विश्वस्त गुरू देसाई आणि संदीप साळसकर, संगीतकार दिनेश वालावलकर आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी स्पर्धेचे संयोजक प्रशांत धोंड म्हणाले की, डॉ. अशोक प्रभू यांनी स्वरसिंधुरत्न स्पर्धा सुरू केली. कोकणातील कलाकारांना प्रकाशात आणणे आणि स्पर्धकांना मुंबईसह मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे असे त्यांचे स्वत्न होते. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित असलेली ही स्पर्धा गोवा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठीही घ्यायची आहे. यापुढीही शास्त्रीय संगीताचीच स्पर्धा होणार असून उत्तरोत्तर तिची काठीण्य पातळी वाढविण्याचा प्रयत्न असेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply