रत्नागिरी : आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीतील श्री हनुमान मंदिरातर्फे यंदा प्रथमच आयोजित केलेल्या वारीला भक्तांचा चांगला प्रतिसाद लाभला.
मारुती मंदिरपासून विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन आज करण्यात आले होते. हनुमान मंदिर (सडा), विठ्ठल मंदिर देवस्थान समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय सेवा समिती, हिंदू राष्ट्र सेना, जनजागृती संघ यांच्या पुढाकाराने ही वारी झाली.
महिनाभर पंढरीची वारी कठीण असल्यामुळे रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातून आपली सेवा विठूरायाच्या चरणी रुजू करावी, वेगवेगळ्या शाळांमधून सहभागी होणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काढलेल्या या वारीत रत्नागिरी जिल्ह्यात राहणारे वारकरी संप्रदायातील अनेक लोक सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या जागेत अस्पृश्य निवारणाची मुहूर्तमेढ रोवली, तेथेच तुकोबारायांचा भेदाभेदभ्रम अमंगळ हा संदेश खऱ्या अर्थाने दृढ करण्यासाठी वारीचे आयोजन करण्यात आले होते. तीन हजारांहून अधिक वारकऱ्यांनी या वारीत सहभाग घेतला. वारीमध्ये भगवे झेंडे फडकले. वारकऱ्यांनी भजने, आरत्या, हरिपाठ म्हटला. तसेच महिलांनी फुगड्या घालत उत्सव साजरा केला. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या साऱ्या आबालवृद्ध वारकऱ्यांनी विठूनामाचा गजर केला.
लायन्स क्लब, रोटरी क्लब, शिवरुद्र ढोल पथक, आम्ही फक्त शिवभक्त ग्रुप, विविध भजनी मंडळे, इस्कॉन, भंडारी समाज इतर सर्व ज्ञाती संस्था, महिला मंडळ, वकील संघटना, व्यापारी संघटना यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि यथायोग्य मदतही केली.
विविध शाळांतील विद्यार्थीसुद्धा वारीत सहभागी झाले होते. महिला वारकऱ्यांची गर्दी जास्त प्रमाणात होती. हिंदू शक्ती आणि सामाजिक समतेचे दर्शन या वेळी घडले. वारीमध्ये पालखी, विठुरायाची प्रतिमा यासह भगवे ध्वज फडकत होते.
कोण अभंग सांगतो आहे, कोणी गजर करतो आहे, अशा पद्धतीने निघालेल्या वारीत टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या गजरात आबालवृद्ध स्त्री- पुरुष दंग झाले होते. पोलिसातला माणूसही भारावून जाऊन त्यानेही एक फुगडी घातलीच.
सकाळी सातच्या सुमारास मारुती मंदिर येथून टाळमृदुंगाच्या साथीने आणि मुखाने विठुनामाचा गजर करत, भजने म्हणत वारी निघाली. पहिले वारकरी माळनाका येथील स्काय वॉकजवळ असताना शेवटचा वारकरी मारुती मंदिरपाशी होता. एवढ्या विराट संख्येने वारकरी यात सहभागी झाले होते. सकाळी वाजण्याच्या दरम्यान वारी विठ्ठल मंदिरात पोहोचली. तेथे सर्व वारकऱ्यांचे स्वागत विठ्ठल मंदिर देवस्थानने केले.




वारीची झलक

