मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांना एमएससीच्या रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम उपकेंद्रात उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेतील प्रथम आणि द्वितीय फेरी पार पडल्यानंतर शिल्लक असणाऱ्या जागांसाठी स्पॉट ॲडमिशन सुरू आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी मूळ कागदपत्रे घेऊन कार्यालयात आल्यावर प्रवेश दिला जाईल. मर्यादित जागा शिल्लक असल्याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.

एमएससी रसायनशास्त्र विभागासाठी एकूण ६० जागा असून ऑरगॅनिक, ॲनालिटिकल, फिजिकल तसेच इनऑरगॅनिक रसायनशास्त्र विषयातील स्पेशलायझेशनमध्ये प्रवेश दिला जातो. झूलॉजी विभागात ओशनोग्राफी स्पेशलायझेशनसाठी एकूण २५ जागा असून हा अभ्यासक्रम विशेषतः सामुद्रिक अभ्यास आणि फिशिंग तसेच फिश प्रोसेसिंग कौशल्याधारित आहे. त्यामुळे संबंधित उद्योगातील रोजगार तसेच संशोधन संधी उपलब्ध होतात. पर्यावरणशास्त्र विभाग गेली २० वर्षे रत्नागिरीत सुरू असून प्रवेशक्षमता २० विद्यार्थी आहे. या विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे पीएचडी सेंटर या विभागात उपलब्ध आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशोधन केंद्र तेथे उपलब्ध असल्याने प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना याचा सर्वांत जास्त फायदा होतो.

तिन्ही विभागांची स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या नेट आणि सेट परीक्षेची तयारीदेखील करून घेतली जाते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी, यासाठी आविष्कारसारख्या संशोधन स्पर्धेतदेखील विद्यार्थी सहभाग घेतात. विद्यार्थ्यांना नोकरीदेखील मिळवून देण्यासाठी विविध कंपन्या रत्नागिरी उपपरिसरात येत असतात.

या तीन विषयांच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठ उपपरिसराने शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या फीच्या सवलती या उपकेंद्राला लागू आहेत.

इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी 08550955999, 9619894543 आणि 09665334103 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply