फापे गुरुजींना गुरुवंदना!

गुरुपौर्णिमेनिमित्ताने एका यशस्वी निवृत्त शिक्षकाने आपल्या यशाला कारणीभूत असलेल्या आपल्या शिक्षकाविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता.

……………………..

मी २०१९ च्या मे महिन्यात सेवानिवृत्त झालो. माझ्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने माझ्या मित्रमंडळीने माझा पवईतल्या हिरानंदानी गार्डनमधील मैदानावर छानसा कार्यक्रम केला. तो कार्यक्रम मला आनंद आणि प्रोत्साहन देणारा ठरला, त्याहीपेक्षा त्याच मंचकावर त्याच कार्यक्रमात माझ्या सन्मानाअगोदर माझे गुरुवर्य फापे गुरुजींचा सन्मान घडवून आणला, तो भाग्यदायी क्षण मला अधिक विलोभनीय आणि कृतकृत्य वाटला. मला धन्य वाटले. मी त्या मित्रमंडळीचा मनापासून आभारी आहे.

मी जिथे काम करीत होतो त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात माझे ज्येष्ठ सहकारी शिक्षक सेवानिवृत्त झाले, त्या त्या वेळी मी पुढाकार घेऊन त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करायला सुरुवात केली आणि तो उपक्रम पुढे सुरूच राहिला. त्यात अधिकाधिक उठावदारपणा आणि मनोरंजनात्मक कशी येईल, होईल याचा विचार होऊ लागला. तसाच मी ज्या सामाजिक संस्थांमध्ये काम करीत आलो आहे, तेथील सभासदांचेही सत्कार समारंभ घडवून आणले. म्हणूनच की काय, माझ्या मित्रमंडळीने त्या परंपरेत मलाही जोडले. हा निरोप समारंभ माझ्या आयुष्यात आला तो माझ्या फापे गुरुजींच्यामुळे.

माझे शिक्षण रिंगणे (ता. लांजा) गावातच झाले. त्याकाळात अंगणवाडी, बालवाडी नसल्याने आम्ही सरळ पहिलीतच पहिले पाऊल शाळेत टाकले. घराशेजारीच मारुतीच्या देवळाच्या बाजूला शाळा होती. तिच्या मागे पंचवास फुटावर नावेरी नदी. दहा-वीस फुटाच्या आकाराची मातीच्या भिंतींची, कौलारू छपराची, दोन दरवाजे असलेली इमारत होती ती. खाली चोपून घट्ट केलेल्या मातीवर सारवण केलेले असायचे. तेही आम्ही मुलेच करत असू. बसण्यासाठी गोणपाट आमचे आम्ही नेलेले होते. पावसाळ्यात त्याचा जास्त उपयोग होत असे.

सुरुवातीला माझे भाऊ शाळेत जात म्हणून त्यांच्या मागून मी हौसेने जाणारा मी, जेव्हा अभ्यास करण्याची वेळ आली तेव्हा कंटाळा करू लागलो. एक दिवस हजेरी घेताना मी सतत गैरहजर असल्याचे गुरुजींच्या लक्षात आले आणि ते सर्व मुलांना काम देऊन माझ्या घरी आले. माझ्या मागे धोशा लावूनही मी ढिम्म बसल्याचे पाहून आईच्या रागाचा पारा चढलेला होताच, त्यात गुरुजीही घरी आलेले. गुरुजींनी माझ्या बखोटीला धरले आणि मी भोकाड पसरून ताकद लावून गुरुजींच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करू लागलो. पण आईने अंगणाच्या कुंपणाची एक शिमटी काढली आणि मला सपासप मारायला सुरुवात केली. मी रडलो, प्रतिकार केला, पण शेवटी शाळेत जाऊन बसलो. मी आईचा लाडका असताना तिने मला असे का मारले? गुरुजी घरी येत तेव्हा माझे कौतुक करायचे. तेसुद्धा आज एवढे का क्रूर झाले? असे प्रश्न आले का असतील तेव्हा त्या बालमनात? आज आठवत नाही, ते पण एक मात्र खरे की आईला आजपर्यंत टरकून होतो आणि गुरुजींबद्दलच्या आदरात कधी अंतर पडले नाही. कारण आईने दिलेली शिस्त आणि गुरुजींचे मार्गदर्शन माझ्या जीवनात मोलाची देणगी आहे.

श्री. शिवराम श्रीपत फापे हे गुरुजींचे नाव. लांजा तालुक्यातील आडवली हे त्यांचे गाव. आडवली गावात सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लांज्यात गेले. आडवलीतील स्वातंत्र्यसैनिक श्यामराव पानवलकरांच्या वडिलांच्या ओळखीने लांज्यात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नाना वंजारेंच्या घरी व्यवस्था झाली. अकरावीला त्यांनी काळे छात्रालयात प्रवेश घेतला. अकरावी झाल्यानंतर त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. भांबेड आणि गोविळ येथे एकेक वर्ष सेवा देऊन रिंगणे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा क्र. ३ या शाळेत आले आणि १३ वर्षे ते तेथेच राहिले.

त्या काळात रस्ते नव्हते, म्हणजे वाहतुकीची बैलगाडीशिवाय काहीच साधने नव्हती. आडवली ते रिंगणे हा तीसेएक किलोमीटरचा डोंगर-दऱ्यांतील पायवाटेने करावा लागे. दर दिवशी एवढा प्रवास करून नोकरी करणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांना रिंगणे गावी राहणे भागच होते. गुरुजींच्यासाठी गणपत पेडणेकर आप्पांनी आपल्या घराच्या पडवीला एकेकाळी दुकान होते, त्या दुकानाची जागा मोकळी करून दिली. मातीची चूल आणि सरणाचीही व्यवस्था केली. गुरुजींनी स्टोव्ह आणलेला होता. भात, डाळ चुलीवर करीत तर चपात्या आणि चहा स्टोव्हवर बनवीत.

मला समजायला लागल्यापासून गुरुजींच्या खोलीत संध्याकाळच्या वेळेत अनेक लोक येऊन बसत असल्याचे मी पाहिले आहे. शेतकरी रानातली कामे आटोपून गुरुजींच्या खाटेवर बसायचे. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या की गुरुजींकडून जगाची खबर ऐकायची आणि जेवणवेळेला घरी जायचे हा इथल्या वयस्क माणसांचा परिपाठ होता. पुढच्या काळात आम्ही मुलेही त्यात असायचो. कारण गुरुजींनी रेडिओ आणला होता. संध्याकाळच्या बातम्या आणि विशेषत: क्रिकेटचे समालोचन ऐकण्याचे वेड गुरुजींकडून मिळाले.

गणपती आणि दिवाळीसारखे मोठे सण सोडले तर गुरुजी सगळ्या सणांत गुरुजी इथेच असल्याने आणि त्या सणात गुरुजी ग्रामस्थांसारखे सहभागी होत असल्याने गुरुजी आमचेच वाटत असत. गोकुळाष्टमीसारख्या सणात आमच्या मारुतीच्या देवळात मांड असतो. पूर्वी तो रात्रभर जागवला जायचा. स्त्रियांच्या फुगड्यांचा कार्यक्रम झाला की भजन व्हायचे. बरीच म्हातारी मंडळी सोबत घोंगड्या घेऊन येत. देवळातला पिरसा पेटलेला असायचा. त्याच्याभोवती बरीच मंडळी कोंडाळ करून झोपत तर गुरुजींच्या वयाचे तरुण पत्त्यांचा खेळ खेळत. मग आम्ही मुले जोडपत्ते एका कोपऱ्यात खेळत असू. दुसऱ्या दिवशी दहीहंडी असायची. जयराम दिवाळे एक हौशी गृहस्थ मुंबईवरून गावी येत आणि आम्हा मुलांना घेऊन घरोघर फिरवीत. त्यात श्रीकृष्ण, पेंद्या, सुदामा, कंस अशी पात्रे रंगविली जात. हे रंगकाम गुरुजी करीत. “या घरात नाही पाणी घागर उताणी रे वनमाळी” असे म्हणून घरासमोरच्या निसरड्या अंगणात नाचत असू. अंगावर पाणी पडल्याशिवाय दुसऱ्या घरात जायचे नाही, असे ठरलेले असायचे. आजकाल अंगणावर पत्रे टाकलेले असल्याने ते आता शक्य नाही. पूर्वी अंगणात दिवाळीनंतर लाकडाचे वासे, चिवे आणि टाळे यांचा मंडप घालत. तो आगोटीला कोसळून ते टाळे मळ्यात जाळून टाकत. घरे फिरून आल्यानंतर देवळाच्या बाजूच्या जागेत खेळ होत. दिवाळे कंस होत आणि अनंद्या श्रीकृष्ण होई. त्यांना गुरुजी छानपैकी सजवायचे. कंस आणि बाळकृष्णाची कुस्ती होई. त्यात कृष्ण कंसाच्या छातीवर बसतो, हे चित्र मनःपटलावर कोरले गेले आहे ते आजही डोळ्यांसमोर उभे राहते. कंस झालेले दिवाळे त्या चिखलात सपशेल पाठीवर पडायचे, अनंद्या त्यांना बुक्क्यांनी मारायचा आणि जमलेले लोक टाळ्या वाजवायचे. श्रीकृष्णचरित्र पुस्तकाशिवाय अगदी बालवयात समजले ते जयराम दिवाळे आणि फापे गुरुजींमुळे.

आमच्या वाडीचे भजन फार पूर्वीपासून आहे. गणपत आप्पांनी जवळजवळ पन्नास वर्षे हे भजन चालविले. गणपतबुवा म्हणून ते लांबपर्यंत सुपरिचित होते. गणपतीच्या सणात वाडीतल्या प्रत्येक घरातल्या गणपतीसमोर भजन करण्याची परंपरा फार जुनी आहे. वाडीत कुणाच्या घरी बारसे असेल, बारावे असेल, वर्षश्राद्ध किंवा सत्यनारायण असेल तर आप्पा भजन करायचे. गुरुजी या भजनातही बसायचे. कधी अभंग म्हणायचे, तर कधी चकवा वाजवायचे. आप्पांना दूर दूरच्या गावातून सुपारी मिळायची. वाडीतील पंचवीस-तीस मंडळी बाहेर पडे. त्यात गुरुजीही असत.

आमच्या हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्सव त्या काळात परिसरातला मोठा उत्सव समजला जायचा. पंधरा-वीस किलोमीटरचे अंतर कापून बैलगाड्या भरून लोक येत असत. दुकानांचीही मोठी गर्दी असे. त्याला कारण होते ते या ठिकाणी होणारे दर्जेदार नाटकांचे प्रयोग. मुंबईचे चाकरमानी नाटक करीत, पण त्या नाटकात गुरुजींचा मोठा सहभाग होता. नाटकाची प्रॉम्प्टिंग हे त्यांचे मुख्य काम असले, तरी स्टेजवर समोर टांगलेल्या पेट्रोमॅक्सला हवा भरणे आणि पुन्हा टांगणे हे काम गुरुजींच्या उंचीमुळे त्यांनाच करावे लागे. एखादा पडदा रंगवायचा असल्यास ते काम गुरुजींनीच करावे. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाची आठवण मला आजही येते. गुरुजींनी त्या नाटकात विमान तयार करून ते एका प्रवेशाच्या वेळी बरोबर रंगमंचावर दाखवले होते.

गुरुजी तसे तरुणच असल्याने इथल्या तरुणांचे ते खास मित्र बनले होते. शिकार करणे हा त्यावेळचा मुख्य छंद असल्याने गुरुजीसुद्धा त्यात बंदूक घेऊन सहभागी होत. इथल्या रानांची इथल्या शेतकऱ्यांइतकी गुरुजींनाही माहिती होती. त्यामुळे कुठल्या बरकंदाराने कुठल्या वाटेवर कुठे लपून बसायचे, हे गुरुजी सांगत. दिवसाची शिकार करायची असेल तर आदल्या रात्री पाटलांच्या अंगणात सगळे झोपायला एकत्र येत आणि बरंकदार पहाटेपूर्वी रानात ठरवून दिलेल्या आपापल्या जागेवर जाऊन बसत. रानकाडे दिवस उजाडताच रानात घुसत आणि मोठमोठा आवाज करीत पुढे जात. टेहेळणी करणाऱ्याच्या नजरेस जनावर दिसले की तो शीळ घालून सर्वांना सावध करी. मग कुठेतरी बार व्हायचे. गोळी लागली असेल तर मोठी हुल्लड उठायची आणि शिकार घेऊन ठरलेल्या जागी एकत्र येत. गुरुजींकडे त्यावेळी एक कसबी शिकारी म्हणून पाहिले जात असे. तसे मासे मारण्यातही गुरुजी पटाईत होते.

गुरुजींचा असा सगळीकडे वावर असल्याने घरच्या कठीण प्रसंगात गुरुजींकडे आधार म्हणून पाहिले जाई. कुणाची मुंबईहून येणारी मनीऑर्डर आली नसेल तर वेळ भागवण्यासाठी गुरुजी मोकळेपणाने मदत करीत. गुरुजींचे तालुक्याच्या ठिकाणी जाणे होत असल्याने छोट्या छोट्या आजारांची औषधे गुरुजी आणून ठेवीत आणि गरजेला लोकांना देत. मोठ्या आजारात मात्र भांबेड किंवा रायपाटण या ठिकाणी डोलीत बसवून रुग्णाला नेत असत. ती डोली उचलायला गुरुजी पुढे असत. अशावेळी जेवणा-खाण्याची आबाळ होत असे, तरीही गुरुजी घरच्या माणसांप्रमाणे राहत. अगदी शेतीच्या कामातही गुरुजींनी मदत केल्याचे मला चांगले स्मरते आहे.

शाळेत मात्र गुरुजी वेगळेच दिसत. उंच शरीरयष्टी असलेल्या गुरुजींचा पेहरावही तसा टापटिपीचा होता. पटेरी लेंग्यावरती ते पॅंट चढवीत. त्यावरती लांब हाताचा शर्ट असे, पण तो कोपराजवळ दुमडलेला असे. मानेवर कॉलरखाली रुमालाची घडी करून ठेवण्याची पद्धत असे. घामाने कॉलर मळू नये हा त्यामागचा उद्देश असावा, पण आम्ही ती पुढे फॅशन म्हणून स्वत: केल्याचे आठवते.

पावसाळ्यात छत्री हा प्रकार गुरुजींमुळे प्रथम बघायला मिळाला. नाहीतर पुरुषांनी घोंगडी, स्त्रियांनी इरले आणि शाळकरी मुलांनी मेणकापड वापरायचे हेच आम्ही पाहिले होते. पावसाच्या पाण्याने पॅंट खालच्या बाजूने भिजू नये म्हणून गुरुजी पोटरीपर्यंत पॅंट वर घेऊन त्यावर क्लिप लावायचे. बारा काड्यांची आणि लाकडी दांड्याची छत्री पाठीमागे खांद्याला लटकवून, पॅंटला क्लिप लावून मळ्यांच्या बांधांवरून तोल सांभाळत येणारे गुरुजी दिसले की आम्ही देवळातून उड्या मारत शाळेत जाऊन बसायचो.

शाळेतील सर्व कामांची वाटणी केलेली असायची. कुणी घंटा द्यायची, कुणी कचरा काढायचा, कुणी प्रार्थना पुढे म्हणायची याचा प्रत्येक आठवड्याचा नियोजन तक्ता असायचा. त्यामुळे गुरुजींना चार वर्ग सहज सांभाळता येत असत. गुरुजी एखाद्या वर्गाला शुद्धलेखनाचे काम, एका वर्गाला पाढे म्हणण्याचे तर कुणाला कविता पाठांतराचे काम देऊन राहिलेल्या वर्गाला शिकवण्याचे काम करत. एखाद्या वर्गाचा आवाज जास्त वाटू लागल्यास त्या वर्गाला देवळात बसायला पाठवीत.

सकाळी शाळा भरताना सुरेल आवाजात गुरुजी प्रार्थना म्हणत आणि आम्ही त्यामागून. प्रत्येक दिवशी कोणती प्रार्थना म्हणायची याचे नियोजन होतेच, पण त्या सर्व प्रार्थना त्यांनी बोरूने सुंदर अक्षरात लिहून त्याची वही टांगून ठेवली होती.

संध्याकाळी शेवटच्या दोन तासांत गुरुजी लेखी काम देत. एक-दोन विद्यार्थ्यांच्या पाट्या तपासून त्यांना गुण देत आणि त्यांना इतरांच्या वह्या तपासायला सांगत. एखाद्या दिवशी दिवसभर गुण मिळविण्यासाठीचे काम देत आणि संध्याकाळी प्रत्येकाने मिळालेले गुण सांगायचे. जास्त गुण मिळविणाऱ्यांचे कौतुक करीत. गुरुजींनी शिकवलेल्या प्रार्थना आणि चालीवरच्या कविता आजही स्मरणात आहेत. तेव्हा शाळाही उत्सवाचा आनंद देणारी वाटे.

शाळेच्या बाजूला छोटीशी मोकळी जागा होती तिथे वेगवेगळी फुलझाडे होती. त्यातील करदाडी, मोगरा आणि बटमोगऱ्याची फुले चांगली आठवतात. पितृपक्षात रोजच कुणाच्या ना कुणाच्या घरी महाळाच्या जेवणासाठी बोलावणे यायचे. गुरुजी आम्हाला तेथे घेऊन जायचे. घरची गरिबी असल्याने अशी पक्वान्ने खाण्याची संधी गुरुजींनी मिळवून दिल्याने तेव्हा नसेल, पण आज खचीतच गुरुजींचे मोठेपण जाणवते.

मग यायचा दसरा. त्यातील सरस्वती पूजनाचा दिवस हा आमच्यासाठी प्रिय दिवस होता. आदल्या रात्री पाटीवर आकड्याची सरस्वती काढायची. सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन नसले तरी धुतल्याने नवे वाटणारे कपडे घालून पाटी बरोबर फुले, तांदुळ आणि काकडी शाळेत न्यायची. पाटी पूजन झाल्यावर सरस्वतीच्या मूर्तीची पूजा, आरती भजन आणि प्रसाद. हा प्रसाद सुक्या खोबऱ्याच्या किसात साखर टाकून केलेला असायचा. त्याच्यासोबत काकडीच्या फोडी. तो प्रसाद पुन्हा पुन्हा खावासा वाटायचा. म्हणून सरस्वतीच्या मूर्तीची राखण करण्याच्या बहाण्याने आम्ही शाळेतच थांबायचो. कुणी पाया पडायला आल्यास त्यांनाही द्यायचा आणि मुलांनाही परत द्यायचा.

खरा आनंद तर वेगळाच होता, रात्रीच्या तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा. त्यात नृत्य, नकला आणि छोट्या एकांकिका असत. पंधरा-वीस दिवस त्याची तयारी करायचो. गुरुजी स्वत: नाचून नृत्य शिकवायचे. ‘वल्हव रे नाखवा ‘ हे गाणे हमखास असायचे. कोळी नृत्यासाठी वेगवेगळे वल्हे केले जायचे. महारथी कर्ण या छोट्या एकांकिकेत मला श्रीकृष्णाची भूमिका दिली होती. गुरुजींनी रंग फासताना “घाबरायचं नाय, तुझं काम चांगलं होणाराय” हे प्रत्येकालाच मायेने सांगितल्याने उत्साह वाढायचा. माझा भाऊ पंढरी हा त्यात अर्जुन होता, तर सरफऱ्यांचा अशोक दुर्योधन झाला होता. मी पडद्यामागून डोकावत असताना गुरुजींनी मला ढकलले आणि माझे वाक्य सांगितले. टाळ्या पडल्या त्या माझ्या वाक्याला की माझ्या विसरलेपणाला हे काहीच कळलं नाही, पण कलाकार म्हणून आयुष्यातली पहिली टाळी मिळाली ती एकांकिका, जिथे सादर झाले ते मंदिर, ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते पालक प्रेक्षक, माझी शाळा आणि ज्यांनी चेहऱ्याला रंग फासून रंगमंचावर ढकलले, ते माझे फापे गुरुजी कायमचेच हृदयात घर करून बसले आहेत.

चौथीनंतर आम्ही १ नंबरच्या शाळेत जाऊ लागलो तरी ३ नंबरच्या आमच्या शाळेच्या शारदोत्सवात सहभागी होतच होतो. पण पुढे गुरुजी बदली होऊन गेले. मीही कॉलेजसाठी दुसऱ्या गावी जाऊ लागलो. त्यावर्षी शारदोत्सव होणार नाही, अशी स्थिती होती. मी अस्वस्थ झालो. मी माझ्या बरोबरीच्या आणि मोठ्या मुलांची बैठक घेतली आणि शारदोत्सवाचे नियोजन केले. त्याचबरोबर वसंत जाधव लिखित ‘येथे बायका मिळतात ‘ ही नाटिका बसविली. गुरुजींच्या गावी जाऊन ती गोष्ट त्यांच्या कानावर घातली. गुरुजींना आनंद झाला. माझ्याकडून त्यांनी सर्व माहिती घेतली आणि चक्क लांज्यातून नाटकाचे पोस्टर बनवून पाठवून दिले. आम्ही ते आमच्याकडच्या दुकानांच्या भिंतीला करवंदीच्या काट्यांनी ठोकून दिले. शाळेच्या नव्या इमारतीच्यासमोर बांधलेल्या सुसज्ज रंगमंचावरील तो कार्यक्रम बघायला बरीच गर्दी लोटली होती. त्या नाटिकेत विलास सखाराम, विलास धोंडू, विश्वनाथ धोंडू, नंदकुमार काशिराम, सुधाकर जयराम या पेडणेकर मुलांच्या सोबत मी भूमिका केली. मी दिग्दर्शन केलेली आयुष्यातील ती पहिली नाटिका होती.
त्यावेळी विजय पांचाळ आणि रविंद्र पेडणेकर यांनी मी लिहिलेल्या गाण्यांना चाली लावून त्यावरती मुलांचे नाच बसविले होते.

मी आणि माझा भाऊ पंढरी एकाच वर्षी दहावी उत्तीर्ण झालो. गुरुजींनी शुभेच्छांचे पत्र पाठविले होते, तरीही ते जुलै महिन्यात रिंगण्याला आले. ऐन लावणीचा काळ असल्याने आम्ही शेतात काम करीत होतो. गुरुजी तिथपर्यंत आले. आम्हाला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवला आणि “शेतीच करीत बसणार आहात का? पुढच्या शिक्षणाचं काय?” असा प्रश्न केला. आम्ही निरुत्तर होतो.

“शिपोशीला कॉलेज आहे आणि वसतिगृहही आहे. मी तिथे बोलतो. उद्याच चला माझ्याबरोबर”, असे सांगून आईलाही त्यांनी समजावून सांगितले. आमचे मावळ चुलते जे आमच्या कुटुंबाला आधार देत होते, त्यांनी “तुमची भरपूर शेती आहे, ती करा”, असे सांगून पुढच्या शिक्षणाची गरज नसल्याचे सांगितले. पंढरी आणि मी रात्रभर चर्चा केली, पंढरीने “मी शेती सांभाळतो, तू पुढे शिकायला गुरुजींबरोबर जा”, असे मला सांगून आईलाही समजावले. सकाळी
उजाडायच्या अगोदर निघायचे ठरल्याने मी लवकरच उठलो. गुरुजींच्या सोबत डोलारखिंडीतून हर्दखळे, भांबेड, कोर्ले, गोविळ, कोलेवाडी, केळवली आणि शिपोशी असा तीस किलोमीटरचा पायी प्रवास करून दुपारनंतर शिपोशीच्या न्या. व्ही. व्ही. आठल्ये विद्यामंदिरात पोहोचलो. गुरुजींनी प्रवेश घेऊन तिथल्या वसतिगृहाचीही व्यवस्था करून दिली आणि एका तरुणाला योग्य मार्गावर सोडल्याच्या समाधानाने गुरुजी तिथून सातेक किलोमीटरवर असलेल्या आडवली गावी डोंगरवाटेने निघून गेले.

एका वर्षानंतर मी मुंबईला गेलो. मोठे बंधू विजय यांनी डीएडला प्रवेश घेतल्याने मुंबईतच राहिलो. गुरुजी पत्र पाठवून आस्थेने चौकशी करीत असत. मी शिक्षक झाल्याचे त्यांना भारी कौतुक होते.

मी वेगवेगळ्या शाळांमध्ये नोकरी केली. पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये रोज सकाळी दोन तास जात असे, तर महानगरपालिकेच्या शाळेत बारा ते सहा असे काम करीत असे. विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकारीही माझ्यावर प्रेम करीत होते. त्याला कारण होते मला येत असलेल्या प्रार्थना, माझे कवितांना चाली लावणे, शाहिरी ढंगात इतिहास शिकवणे, शाळेतला परिपाठ, शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम करणे, सर्वांना सहकार्य करणे. हे मला कुठून मिळाले होते? माझे बालपण ज्या गावात गेले, ज्या शाळांत माझे शिक्षण झाले, तिथूनच मला सारे मिळाले होते. ज्या अनेक शिक्षकांनी मला शिकवले, त्यातील सर्वप्रथम नाव आहे ‘फापे गुरुजी’.

मी सेवानिवृत्त होत असताना, माझ्या सन्मानाच्या कार्यक्रमाचे नियोजन होत असताना मी मित्रमंडळीला सांगितले की, मी शिक्षक म्हणून जर यशस्वी झालो असेन, तर त्यात मोठा वाटा माझ्या शिक्षकांचा आहे. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे.”

माझ्या मित्रमंडळीने सूचना मान्य केली. मी माझ्या गुरुजनांना आमंत्रण देण्यासाठी बाहेर पडलो. रिंगणे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ढेकळे सर निवृत्तीनंतर निपाणीत राहत असल्याने मी तिकडे गेलो. त्यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. त्यांना माझी सूचना फार आवडली, पण प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईला येणे शक्य नव्हते.

मी आडवलीला गेलो. शिमग्याचे दिवस असल्याने गुरुजी मांडावर गेल्याचे कळले. बाईंनी कुणाकडे तरी निरोप धाडला. मी आल्याचे कळल्याने गुरुजी लगेच घरी आले. आमची भेट झाली. आमचे दोघांचेही डोळे भरून आले. माझ्यासोबत आलेले विजय हटकर सरसुद्धा क्षणभर भावूक झाले. गुरुजींनी मुंबईला येण्याचे मान्य केले. त्यांच्या मुलींनी त्यांना मुंबईत आणण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. त्यांच्यामुळेच मला माझ्या गुरुजींबद्दलची कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त करण्याची संधी मिळाली.

गुरुजी माझ्या कुटुंबातलेच वाटावे, असे त्यांचे वागणे होते. माझ्या लहानपणीच माझे वडील वारले, तेव्हा गुरुजी रिंगण्यातच होते. आमच्या कुटुंबावरचे ते मोठे संकट होते. त्यावेळेपासून गुरुजी आमच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले. माझा भाऊ पंढरी अकाली निघून गेला. गुरुजी तेव्हाही सांत्वन करायला आले. मी नव्याने घर बांधताना शुभेच्छा द्यायला धावत आले. आईच्या निधनानंतर त्यांना येणे शक्य झाले नाही. त्यानंतर प्रथमच भेटत असल्याने त्यांनी माझ्या आसवांना वाट मोकळी करून दिली.

शाळेत शिकवण्यापुरतीच शिक्षकाची जबाबदारी असते, ही आजची संकल्पना, पण आपल्या विद्यार्थ्यांना शाळेबरोबर त्यांच्या जीवनात आवश्यक असेल तेथे मार्गदर्शन करणाऱ्या फापे गुरुजींकडे पाहिले की शिक्षकाची उंची काय असावी लागते, याचा बोध होतो.

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना वंदन करण्याचा योग आला. त्यांच्या सहवासात त्यांच्याबरोबरच्या चाळवळलेल्या आठवणी शब्दबद्ध कराव्याशा वाटल्या म्हणून हा लेखनप्रपंच.

  • सुभाष लाड, मुंबई
    (संपर्क : ९१५२६३५२२५)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply