Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

खल्वायनतर्फे रत्नागिरीत प्रथमच नाट्य कार्यशाळा

Advertisements

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेमार्फत प्रथमच कै. चंद्रशेखर जोशी स्मृती नाट्य कार्यशाळा (ओळख नाटकाची) आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.

संस्थेचे हरहुन्नरी कलाकार कै. चंद्रशेखर जोशी यांनी संगीत आणि गद्य राज्य नाट्य स्पर्धेच्या पूर्वी नवोदित कलाकार, संस्थांना माहिती देण्याकरिता नाट्य कार्यशाळा करावी, अशी संकल्पना गतवर्षी मांडली होती, परंतु त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून प्रथमच अशी नाट्य कार्यशाळा खल्वायन संस्थेतर्फे आयोजित केली आहे.

कार्यशाळेत प्रा. विजयकुमार रानडे, पेंटर नंदू सोहनी, वामन जोग, अनिल दांडेकर, अमेय धोपटकर मार्गदर्शन करणार आहेत. वामन जोग गेली ४५ वर्षे नाट्यकर्मी म्हणून कार्यरत असून त्यांना भूमिका आणि दिग्दर्शनाची ३९ पारितोषिके मिळाली आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट, नाटकांत त्यांनी अभिनय केला आहे. मोरेश्वर तथा नंदकुमार सोहनी १९७३ पासून रंगभूषा, नेपथ्य, वेषभूषा या व्यवसायात कार्यरत आहेत. प्रा. विजयकुमार रानडे गोगटे- जोगळेकर कॉलेज निवृत्त प्राध्यापक आहेत. प्रा. भालबा केळकर हे त्यांचे गुरू असून त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्यशिक्षण या सूत्रावर आधारित अनेक कार्यशाळा घेतल्या. पुण्यात १९७२ ते १९७८ या कालावधीत विविध नाटकांमध्ये, शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी काम केले. अनिल दांडेकर रत्नागिरीत ४० वर्षे रंगकर्मी, ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आहेत. त्यांची मित्र फाउंडेशन ही संस्था असून सेतू या नाटकाच्या लेखनासाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अमेय धोपटकर युवा कलाकार असून महाविद्यालयीन काळात त्यांनी सकाळ महाकरंडकमध्ये अंतिम विजेता आणि वाचिक अभिनयाचे सर्वोत्तम राज्यस्तरीय बक्षीस पटकावले आहे. अनेक एकांकिकांसाठी त्यांनी पारितोषिके मिळाली आहेत.

या साऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खल्वायनची कार्यशाळा होणार आहे. नाटक म्हणजे काय, त्याचे घटक, नाट्यवाचन, वाचिक, कायिक, सात्विक, भाषाप्रभुत्व, स्मरणशक्ती वृद्धी आणि त्यासाठीचे व्यायाम, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्‍वसंगीत, रंगमचावरील वावर, समयसूचकता, नटाने पाळायचे नियम, नाटकाचा उद्देश, सफलता आणि करिअर संधी, प्रश्‍नोत्तरे व शंकासमाधान असे कार्यशाळेचे स्वरूप आहे.

कार्यशाळेत १२ वर्षांपुढील सर्व स्त्रीपुरुषांना प्रवेश आहे. दुपारी भोजनासाठी शिबिरार्थींनी घरून डबा आणावा. ज्यांना शक्य नाही, त्यांना ७० रुपये आकारून खिचडी देण्याची व्यवस्था करण्यात येईल. सकाळी आणि दुपारा चहापानाची सोय आयोजकांमार्फत केली आहे. कार्यशाळेचे प्रवेशशुल्क २०० रुपये आहे. प्रवेश मर्यादित असून सहभाग निश्‍चितीसाठी १८ वामन जोग (9881125608) किंवा श्रीनिवास जोशी (9422473080) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version