लांजा : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या रत्नागिरीतील कोकण विभागीय मंडळाला लवकरच स्वत:ची हक्काची इमारत मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
रत्नसिंधू योजनेविषयी पुनर्विचार करण्यासाठी सिंधुदुर्गातून रत्नागिरी दौऱ्यावर निघालेले श्री. केसरकर यांनी जिल्ह्यातील नामवंत प्रशाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल आणि तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यायलयाला धावती भेट दिली. त्यावेळी यावेळी त्यांनी निरपेक्ष पद्धतीने झोकून देत संस्थेचा विकासासाठी पुढे असलेले संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये यांचे कौतुक केले. राज्यात नव्याने येणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात कौशल्याधारित शिक्षणाचा प्रसार, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने पाचवीपासूनच गुणवत्तावाढीस मदत करणाऱ्या विविध चाचण्या या अभिनव योजना राबविल्या जातील. स्पर्धापरीक्षेतील मराठी टक्का वाढीस लागणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये यांनी श्री. केसरकर यांचा सत्कार केला. शिक्षण मंत्री झाल्यानंतर प्रथमच लांज्यात आलेले श्री. केसरकर यांचे मुख्याध्यापक श्रीमती विद्या आठवले यांनी प्रशालेच्या वतीने, विनय बुटाला यांनी शिक्षक-पालक संघटनेच्या वतीने, तर पुरुषोत्तम साळवी यांनी माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने मंत्र्यांचा सत्कार केला.
संस्थासंचालक महंमदशेठ रखांगी यांनी प्रास्ताविकात श्री. केसरकर यांच्या अभ्यासू कार्यपद्धतीचे कौतुक केले. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिक्षण संस्था आणि शिक्षकांचे अनेक वर्षांचे प्रलंबिल प्रश्न श्री. केसरकर यांनी आपल्या कार्यकालात मार्गी लावून न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत, लांज्याचे तहसीलदार प्रमोद कदम, संस्थेचे उपाध्यक्ष सुनील ऊर्फ राजू कुरूप, कार्यवाह विजय खवळे, सहकार्यवाह संजय तेंडुलकर, संचालक राजेश शेट्ये, पुरुषोत्तम साळवी, माजी विद्यार्थी असोसिएशनचे अभिजित राजेशिर्के, उपमुख्याध्यापक जाधव सर, पर्यवेक्षक भैरू सोनवलकर, गोविळ हायस्कूलचे मनोज लाखण, सर्व शिक्षक उपस्थित होते. पदाधिकारी आणि शिक्षकांशी संवाद साधल्यानंतर मंत्रिमहोदयांनी आठवी आणि नववीच्या वर्गांना अचानक भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांनीही योग्य उत्तरे दिल्याने, मुलांची गुणवत्ता पाहून श्री. केसरकर यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे निवेदन विजय हटकर यांनी केले.




