देवरूख : येथील क्रांती व्यापारी संघटना आणि देवरूख नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि. २१ ऑक्टोबर) देवनगरी देवरूख या पहिल्या पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
नगर पंचायतीच्या सभागृहात सकाळी १० वाजता या पर्यटन परिषदेला प्रारंभ होणार आहे. यावेळी कोलाडचे महेश सानप, सिंगापूरचे मंगेश कोयंडे, कोकण पर्यटनचे संजय यादवराव, रत्नागिरी जिल्हा पर्यटन संस्थेचे राजू भाटलेकर, आमदार शेखर निकम, तहसीलदार, बीडीओ, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
देवरूख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तेथील हवामान आरोग्यासाठी आल्हाददायी आहे. यामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक देवरूखमध्ये राहणे पसंत करतात. देवरूख व परिसरात अनेक मनमोहक ठिकाणे आहेत. देवरूख शहराची पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. ते आणखी विकसित व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी क्रांती व्यापारी संघटना प्रयत्नशील आहे. त्याचेच एक पुढचे पाऊल पुढे टाकत पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक तरुणांना टुरिस्ट गाइडचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
परिषदेत उपस्थित राहणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यटन परिषदेला उपस्थित राहून देवनगरी देवरूख ही संकल्पना समजून घ्यावी, असे आवाहन निखिल कोळवणकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेपसंगी क्रांती व्यापारी संघटनेचे नितीन हेगशेट्ये, अण्णा बेर्डे उपस्थित होते.




