देवरूख : देवरूखचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व वाढावे यासाठी क्रांती व्यापारी संघटनेतर्फे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून येत्या १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी दिवाळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
देवनगरी देवरूख हा पर्यटन ब्रँड विकसित करून त्याचे मार्केटिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीची खूप मोलाची साथ आहे. तीच साथ कायम वाढत राहावी, यासाठी प्रत्येक व्यक्तीला सामावून घेणे आवश्यक आहे. याचसाठी देवनगरी देवरूख दिवाळी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये देवनगरी दिवाळी पहाट मैफिल सप्तलिंगी नदीच्या काठच्या शिवलिंगावर रचलेल्या गाण्याबरोबर भावगीते, भक्तिगीतांची सुरेल मेजवानी ठरणारा राजू शेठ घोसाळकर यांनी बसवलेला अप्रतिम कार्यक्रम १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता सोळजाई मंदिरात होणार आहे. सुप्रसिद्ध गायक पायल घोसाळकर आणि स्नेहल लिंगायत त्यात गायन करणार असून हार्मोनियम साथ दिलीप विंचू, तर पखवाज साथ स्मित अमोल जागुष्टे करणार आहेत.
दुसरा काशी रामेश्वर दिंडी यात्रेचा कार्यक्रम १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. देवरूखमध्ये फार प्राचीन काळी प्रत्येक मंदिरात पारावर होम हवन, साधना, तप केले जायचे. अनेक महान ऋषीमुनींचे वास्तव्य देवरूखमध्ये होते. ऋषीमुनींना भविष्यात कलियुग येणार आहे, हे माहीत होते. हिंदूधर्मीयांना २१ दिवसांची पवित्र काशी रामेश्वर यात्रा करणे सहज शक्य होणार नाही, हे त्यांनी जाणले होते. त्यासाठी त्यांनी देवरूखमध्ये तप शिव साधना करून आवाहन केले. श्री काशिविश्वनाथ आणि श्री रामेश्वर अवतीर्ण झाले आणि आधुनिक युगात लोकांना धर्मकार्य जागृत ठेवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. हाच धागा पकडून १३ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता काशिरामेश्वर यात्रा दिंडी आयोजित करण्यात आली आहे. देवरूख येथील पंताभाऊ जोशी यांच्या सिद्धिविनायक मंगल कार्यालयशेजारी वसलेल्या श्री काशिविश्वनाथ मणिकर्णिका घाटावर सप्तलिंगीचे पाणी भरून ते चालत जाऊन श्री रामेश्वर शिवलिंगावर वाहायचे आणि श्री रामेश्वर घाटावर पाणी भरून ते श्री काशिविश्वनाथाच्या शिव लिंगावर वाहायचे आहे. काशीहून रामेश्वराला जाताना वाटेत श्रीशैल येथे श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला भेट देऊन दोन्ही ठिकाणचे पाणी वाहण्याची प्रथा आहे. तसेच देवरूखमध्ये श्री दुबळेश्वर मंदिरात भेट दिली जाणार आहे. तेथे दोन्ही ठिकाणचे पाणी वाहिले जाणार आहे.
देवनगरी देवरूख दिवाळी उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
