‘कोमसाप-मालवण’चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा : मंगेश मसके

मालवण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा, असे उल्लेखनीय साहित्यिक कार्य कोमसाप मालवणने केले आहे, असे उद्गार परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केले.

ये गऽ ये गऽऽ सरी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. येथील बॅ. नाथ पै सेवांगणाच्या सभागृहात हा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात झाला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सदस्य रुजारिओ पिंटो, कोमसाप मालवण शाखाध्यक्ष सुरेश ठाकूर, सत्त्वश्री प्रकाशनचे प्रकाशक प्रमोद कोनकर, माधव गावकर, अनिरुद्ध आचरेकर, नवनाथ भोळे, गुरुनाथ ताम्हणकर उपस्थित होते. काव्यसंग्रहाच्या ई-बुकचेही या वेळी प्रकाशन झाले.

कवी केशवसुतांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील स्मारकाला अर्पण केलेल्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन मंगेश मसके, सुरेंद्र सकपाळ, विजय चौकेकर, चंद्रशेखर हडप यांच्या उपस्थितीत कवी केशवसुत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्ज्वलनाने झाले. श्री. मसके पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत मालवण शाखेने मराठी साहित्यात सिंधुसाहित्यसरिता, बीज अंकुरे अंकुरे, ये गऽ ये गऽऽ सरी या तीन पुस्तकांचे प्रकाशन करून जवळजवळ शंभर लिहित्या हातांना साहित्यिक उभारी दिली आहे. (ही तिन्ही पुस्तके कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.)

यानिमित्ताने माधवराव गावकर यांनी लिहिलेल्या स्वतः लिहिलेल्या अर्पणपत्रिकेचे स्वतः गायन केले. कै. डॉ. विद्याधर करंदीकर लिखित अक्षरांच्या आरतीच्या गायनाने माधवराव गावकर यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. गुरुनाथ ताम्हणकर यांनी संपादकांचे मनोगत वाचले. उज्ज्वला धानजी यांनी काव्यसंग्रहाला ज्यांचे सहकार्य लाभले, त्यांचा ऋणनिर्देश केला. सर्व पंचवीस कवींच्या वतीने चारुशीला देऊलकर यांनी काव्यसंग्रह निर्मितीमधील आनंद ओघवत्या शैलीत व्यक्त केला. बदलत्या प्रवाहाबरोबर आजच्या लेखकाने साहित्य टिकवणे व प्रसार करणे ही जबाबदारी स्वतः उचलली पाहिजे. आधुनिक तंत्राचाही आपल्या साहित्य निर्मितीमध्ये वापर करावा, असे आवाहन प्रकाशक प्रमोद कोनकर यांनी केले.

काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने रुजारिओ पिंटो, एकनाथ गायकवाड व सुनंदा कांबळे यांची काव्यमैफल आयोजित करण्यात आली. त्यांनी सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. पाहुण्यांचे स्वागत स्मिता शितूत व दिपाली कांदळगावकर यांनी केले.

मंदार सांबारी यांनी सुस्वर सादर केलेल्या स्वलिखित भैरवीने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले, तर आभार ऋतुजा केळकर यांनी मानले. यावेळी सचिन केळकर, अनिकेत कोनकर, चंद्रशेखर हडप, त्रिंबक आजगावकर, कुमार कांबळे, सदानंद कांबळी, लक्ष्मणराव आचरेकर आदी मान्यवर व कोमसाप मालवणचे सदस्य उपस्थित होते.

ई-बुक लिंक : https://play.google.com/store/books/details?id=V3_gEAAAQBAJ

पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क : ९८२२२५५६२१, ९४२३२९२१६२

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply