रत्नागिरीत शुक्रवारी जागतिक पर्यटन दिनानिमित्त अथांग ते उत्तुंग

रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत अथांग ते उत्तुंग हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २७ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

सॅटर्डे क्लब, श्री दर्या सागर पर्यटन व सेवा सहकारी संस्था, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, निसर्गयात्री, असीमित व अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमात वारसास्थळ संवर्धन सल्लागार तेजस्विनी आफळे, लेखक आणि साहसी पर्यटनाचे महाराष्ट्रातले प्रणेते वसंत वसंत लिमये, पितांबरी उद्योग समूहाचे संचालक रवींद्र प्रभुदेसाई, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, सॅटर्डे क्लबचे वेबसाइड सेल हेड गिरीश घुगरे आणि कोकण रिजन हेड राम कोळवणकर, इन्फिगो नेत्र रुग्णालयाचे डॉ. श्रीधर ठाकूर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्ह्याला निसर्ग, इतिहास आणि परंपरा यांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. अथांग अशा समुद्रापासून ते रांगड्या सह्याद्रीपर्यंत पसरलेल्या जिल्ह्यात सर्वच बाबतीत फार मोठी विविधता बघायला मिळते. याच सोबत सह्याद्रीच्या काळ्या कातळापासून ते सड्यांवरच्या जांभ्याच्या पठारापर्यंतची भूवैविधतादेखील दिसते. समुद्रकिनाऱ्यांवरचे सागरी दुर्ग ते कड्याकपारीतील डोंगरी दुर्ग, रमणीय समुद्रकिनाऱ्यांपासून ते गिरीस्थानांपर्यंत, अभ्यासकांना आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या असंख्य गोष्टी जिल्ह्यामध्ये आहेत. जिल्ह्यातील ९ ठिकाणे जागतिक वारसास्थळांच्या संभाव्य यादीत नोंद होताहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा सामील होत आहे. यातून पर्यटनाच्या नवीन संधी आणि व्यवसायाची नवीन दालने उघडणार आहेत.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोकणभूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांत, रत्नागिरी शहर पर्यटन सहकारी संस्था, गणपतीपुळे हॉटेल असोसिएशन, पर्यटन व्यावसायिक महासंघ, कोकण विभाग, कोकण पर्यटन सहकारी संस्था, देवरूख, गुहागर लॉज व हॉटेल असोसिएशन, अपरांत भूमी पर्यटन विकास संस्था, ग्लोबल चिपळूण, ग्लोबल लांजा, माय राजापूर, मित्र मेळा राजापूर, सुवर्णसूर्य फाउंडेशन, दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठान या संस्थांचे सहकार्य लाभले आहे. सर्व पर्यटनप्रेमी, व्यावसायिक आणि पूरक व्यावसायिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply