शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षकभरतीच्या बंदीवर तोडगा

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतनातल्या पदभरतीबाबतच्या नव्या निकषांनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना राज्यातल्या रिक्त जागांवर समायोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टळणार असल्याची माहिती रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

रत्नागिरीसह राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येवर काही तोडगे काढण्यात आले असून लवकरच शिक्षक उपलब्ध करण्याकरिता आज, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल, असे बाळ माने यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरी तेथे ५० टक्केही शिक्षक कार्यरत नसल्याची बाब श्री. माने यांनी काल तंत्रनिकेतनला दिलेल्या भेटीत लक्षात आली. श्री. माने यांनी विद्यार्थ्यांसमवेत तेथील उपाहारगृहात दुपारच्या जेवणात पोळी, भाजीचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी बोलताना त्यांच्या समस्या मांडल्या. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कॉलेज असते, परंतु दिवसातल्या ६ पैकी पैकी २ तासिका होतात. उर्वरित विषयांना शिक्षकच नसल्यामुळे तासिका होतच नाहीत. यामुळे आम्ही विद्यार्थी शिकणार कसे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. गेली पंधरा वर्षे रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कायमस्वरूपी प्राचार्य नसल्याची खंत व्यक्त केली. अनेक वर्षे प्रभारी प्राचार्यच कामकाज पाहत आहेत. काही शिक्षकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे शिक्षक भरती होऊ शकत नाही, असा तांत्रिक मुद्दा समोर आला. परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

श्री. माने यांनी यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी फोनवरून लगेच चर्चा केली. त्यानुसार आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला तंत्रशिक्षण संचालक श्री. मोहितकर आणि अन्. प्रमुख अधिकारी उपस्थित होते. शिक्षकभरतीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. मात्र राज्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व स्थगिती उठवण्यासंदर्भात पहिला पर्याय म्हणून विद्यार्थ्यांच्या वतीने पालक म्हणून खंडपीठाकडे याचिका मांडण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अॅडव्होकेट जनरल यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य मांडणी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन चंद्रकांतदादांनी दिल्याचे बाळ माने यांनी सांगितले.
एमपीएससीच्या माध्यमातून पद भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यापूर्वी तंत्रनिकेतनमध्ये १५ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असत. आता हा नियम २५ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असे झाला आहे. त्यामुळे मोठ्या शहरांतील पॉलिटेक्निकमध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या प्राध्यापकांना जवळच्या जिल्ह्यात विनंती करून पाठवण्यात येणार आहे. हा चांगला निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील. यासंदर्भातील प्रक्रिया करण्याचे आश्वासनही चंद्रकांत दादांनी दिले आहे.

आजच्या चर्चेप्रसंगी दादांचे स्वीय सहायक अतुल खानोलकर यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आजच्या बैठकीला युवा नेते मिहीर माने, तंत्रशिक्षण संचालक तसेच अधिकारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply