रत्नागिरी : येथील फाटक हायस्कूलच्या १९८६ च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्मृतिगंध ८६ या ग्रुपने स्वा. सावरकर चौकातील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत करून त्यांची दिवाळी गोड केली.
दरवर्षी दिवाळीचा आनंद आपण आपले कुटुंबीय, नातेवाइकांसोबत द्विगुणित करतो. परंतु समाजातील वंचित, दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी काही करावे, या हेतूने फाटक हायस्कूलच्या १९८६ च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्मृतिगंध ८६ या ग्रुपने एकूण २६ हजार रुपयांची मदत केली. त्यामध्ये २१ हजार रुपये गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत म्हणून दिले आहेत, तर पाच हजार रुपयांचा खाऊ विद्यार्थ्यांसाठी दिला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि त्यांची दिवाळी गोड झाली.
स्मृतिगंध ८६ ग्रुपतर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेले हे माजी विद्यार्थी समाजात सकारात्मक कार्यक्रमांसाठी प्रयत्नशील असतात. मूकबधिर विद्यालयात दीपावलीनिमित्त प्रदर्शन सुरू झाल्याची बातमी वाचनात आल्यानंतर या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत करावी, असे ग्रुपच्या सदस्यांना सुचले आणि त्यांनी तसा मेसेज त्यांच्या व्हॉटस अॅप ग्रुपवर पाठवला. याला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाने आपल्याला शक्य असणारी रक्कम तत्काळ गोळा केली आणि शाळेत प्रदर्शन सुरू असताना वितरित केली.
यावेळी शाळेत सुरू असलेल्या हस्तकला प्रदर्शनातील शोभिवंत वस्तू, मातीपासून बनवलेले मावळे, छत्रपती शिवाजी महाराज, काष्ठशिल्प, लाकडांच्या तुकड्यांपासून बनवलेल्या गाड्या, खेळणी, कलात्मक वस्तू पाहून स्मृतिगंध ग्रुपचे सदस्य भारावून गेले. या वस्तू खूपच सुंदर आहेत. विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करताना आम्ही दिलेली मदत तुटपुंजी आहे, परंतु शाळेच्या गरजेनुसार यथाशक्ती मदत करण्याची ग्वाही ग्रुपतर्फे देण्यात आली.
यावेळी स्मृतिगंध ग्रुपचे ग्रुपचे संस्थापक सचिन वहाळकर, ग्रुप अॅडमिन अरुण कीर, सदानंद कांबळे, वैशाली जोशी, स्वाती घगवे, नंदा होतेकर, पराग सुर्वे, सोमनाथ रुणकर, महेश पोटफोड आणि या ग्रुपच्या सदस्य तथा या विद्यालयाच्या व्यवस्थापिका पद्मजा आठल्ये आदी उपस्थित होते. शाळेत काही विद्यार्थी दूरवरून येतात, त्यांच्या काही शैक्षणिक अडचणी पाहता त्यांच्याकरिता ग्रुपने २१ हजार रुपये सुपूर्द केले. खाऊसाठी ५ हजार रुपये मुख्याध्यापक गजानन रजपूत यांच्याकडे दिले.
यावेळी मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षिका सीमा मुळ्ये, रमेश घवाळी, उपासना गोसावी, राजकुमार कसबे, दीप्ती खेडेकर, हनुमंत गायकवाड, साक्षी वासावे, माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. तसेच आपण दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी असल्यामुळे यापुढेही मूकबधिर विद्यालयासही शक्य ती मदत करावी, असे आवाहन मुख्याध्यापक श्री. रजपूत यांनी केले.


