खल्वायनच्या दिवाळी पाडवा मैफलीत अभिषेकी रंग

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. अभिषेकी रंग नावाची ही मैफल येत्या बुधवारी (दि. २६ ऑक्टोबर) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत रत्नागिरीत गुरुकृपा मंगल कार्यालयात होणार आहे.

सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध आणि अजरामर केलेले अभंग, नाट्यपदे या मैफलीत सादर होणार आहेत. सुप्रसिद्ध निवेदिका पूर्वा पेठे आपल्या निवेदनकौशल्यातून पं. अभिषेकी यांचा सांगीतिक प्रवास रसिकांसमोर उलगडणार आहेत. पुण्याची राधिका ताम्हणकर, चिपळूणचा विशारद गुरव आणि रत्नागिरीचा अष्टपैलू गायक अभिजित भट आपल्या गायनकौशल्यातून अभिषेकी बुवांच्या रचना सादर करणार आहेत. रत्नागिरीच्या उद्योग क्षेत्रातील कंनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांनी ही मैफल प्रायोजित केली आहे.

गायिका राधिका ताम्हणकर यांनी एम.ए. (संगीत) पदवी मिळविली असून त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकींचे पटट्शिष्य पं. हेमंत पेंडसे यांच्याकडे त्यांचे गायनाचे शिक्षण सुरू आहे. विदुषी देवकी पंडित यांचे काही काळ मार्गदर्शन त्यांना मिळालेले आहे. आकाशवाणी पुणे केंद्राची बी हाय ग्रेड त्यांना प्राप्त असून गजाननबुवा जोशी आणि स्वरवेध स्मृती पुरस्काराने त्या सन्मानित आहेत.

दुसरे गायक विशारद गुरव यांचे सुरवातीचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण महेशकुमार देशपांडे आणि नंतर जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक आणि आकाशवाणी कलावंत गुळवणी सर यांच्याकडे सुरू आहे. सं. सुवर्णतुला नाटकासाठी उत्कृष्ट गायक नट म्हणून महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेत त्यांना रौप्यपदक मिळालेले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कै. राम मराठे राग गायन स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.

तिसरे रत्नागिरीचे अष्टपैलू गायक अभिजित भट यांचे शास्त्रीय गायनाचे सुरवातीचे शिक्षण श्रीमती संध्या सुर्वे आणि नंतरचे जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक व आकाशवाणी कलावंत प्रसाद गुळवणी सर यांच्याकडे सुरू आहे. संगीत नाटकांतुनही त्यांनी आपल्या गायनाचा ठसा उमटविला आहे. भावगीते आणि मराठी सिनेगीते गाण्यातही त्यांचा हातखंडा आहे.

या मैफलीला प्रसिद्ध वादक आणि पं. रामदास पळसुले यांचे पट्टशिष्य, आकाशवाणी ए ग्रेड प्राप्त कलाकार रामकृष्ण करंबेळकर तबला साथ करणार आहेत. विजय रानडे आणि पं. विश्‍वनाथ कान्हेरे यांचे पट्टशिष्य वरद सोहनी ऑर्गनची साथ करणार आहेत. रत्नागिरीचे चतुरस्र कलाव़ंत उदय गोखले व्हायोलिनची साथ करणार आहेत.

या कार्यक्रमाची ५० रुपयांची देणगी प्रवेशिका त्याच दिवशी कार्यक्रमस्थळी उपलब्ध होणार असून संगीत रसिकांनी मैफलीला उपस्थित राहून दीपावलीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply