संस्कृतच्या अनौपचारिक अभ्यासक्रमाचे रत्नागिरीत प्रमाणपत्र वितरण

रत्नागिरी : शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. पाच हजार वर्षे जुनी संस्कृत भाषा शिकण्यासाठी हे ज्येष्ठ विद्यार्थी आले आहेत. ही संख्या अशीच वाढत राहो, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे विशेष कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे यांनी केले.

नवी दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात चालू आहे. या वर्षीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन व मागील परीक्षांचे प्रमाणपत्र वितरण महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, केंद्राच्या प्रमुख आणि संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये व शिक्षक आचार्य विशाल भट्ट उपस्थित होते.

संगीत विशारद, इतिहास, हिंदीचा गाढा अभ्यास असणारे व मूळचे उस्मानाबाद येथील वारकरी श्री. चांदणे कीर्तनकार असल्याने त्यांनी अनेक दाखले देत संस्कृतची महती आणि आपण कसे जगावे याबद्दल विवेचन केले. हसत खेळत आणि प्रबोधन करत त्यांनी व्याख्यान दिले. श्री. चांदणे म्हणाले की, . जोपर्यंत यश समाधानाच्या पातळीवर उतरत नाही, तोपर्यंत जगण्याला अर्थ नाही. राग आवरा, संयम बाळगा. कारण अनेकांना शाब्दिक विजयाचा आनंद वाटतो, पण तो चुकीचा आहे. नशीब आणि मेहनतीची किल्ली एकदम लावली की यश मिळतेच. साध्य, साधन आणि सिद्धता या तत्त्वावर आपण जीवन जगत असतो. परंतु आपल्याला साधनांचा मोह जडतो. सिद्धतेपर्यंत पोहोचलो की साधने सोडवली जात नाहीत. स्वप्नांना सत्याच्या खांद्यावर बसून प्रगती करायची असते. रत्नागिरीतील सर्व मोठी माणसे मराठी माध्यमातून शिकून मोठे झाले आहेत. सध्या इंग्रजी माध्यमातून शिकण्याकडे अनेकांचा कल दिसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। मराठीतून शिक्षण, ज्ञान खूप काही मिळते. आपण समाजाला मदत केली पाहिजे, याची जाणीव ठेवा. सध्या मोबाइलमुळे वाचन संस्कृती कमी झाल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. दृश्य माध्यमातून भाषा शिकली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले की, महाविद्यालय संस्कृतची चळवळ राबवत आहे. अभ्यास, वाचन, बोलण्याप्रमाणे विद्यार्थ्यांना संगणकावर संस्कृतमधून टापयिंगचे प्रशिक्षण द्यावे. त्यातून संस्कृतचा प्रचार, प्रसाराचे काम आणखी वाढेल. महाविद्यालयात संस्कृतचा शब्द लिहून त्याखाली मराठीतील शब्द लिहिला तर विद्यार्थ्यांचाही शब्दसंग्रह वाढेल.

संस्कृत विभागप्रमुख आणि अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राच्या अधिकारी डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविकामध्ये अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राविषयी माहिती दिली. संस्कृतचा अभ्यास सोपा आहे, सर्वांना ते शिकता यावे याकरिता भारतात सर्वत्र अभ्यासक्रम शिकवला जातो. भाषा शिक्षणामुळे सर्व विद्यार्थी संस्कृतमध्ये बोलायला शिकतात, असे त्यांनी सांगितले.

आचार्य विशालभट्ट यांनी सांगितले की, संस्कृत शिक्षण केंद्राच्या भारतभर शाखा आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. प्रा. जयंत अभ्यंकर यांनी निवेदन केले. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केले.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply