
संगमेश्वर : मंदिराच्या परिसरात संगीत सेवा सादर करण्याची प्राचीन परंपरा पुन्हा एकदा जोपासण्याचे हेतूने संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील पुरातन कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात येत्या शुक्रवारपासून (दि. १६ डिसेंबर) तीन दिवस श्री कर्णेश्वर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
श्री कर्णेश्वर देवस्थान सार्वजनिक न्यास आणि कलांगण-संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या पहिल्याच अभिनव उपक्रमाबाबत माहिती देताना महोत्सवाचे समन्वयक निबंध कानिटकर आणि ‘कलांगण’चे प्रवर्तक अमोल लोध यांनी सांगितले की, मंदिराचे जतन आणि संवर्धन हे केवळ श्रद्धेपुरते मर्यादित न राहता त्या माध्यमातून भारतीय कला आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही उत्तम माध्यम ठरावे, या हेतूने हा महोत्सव भरवण्यात आला आहे. येत्या १६ ते १८ डिसेंबर हे तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवात नृत्य, वादन आणि गायन या कलांचा आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.
प्रख्यात व्हायोलिन वादक श्रृती भावे (मुंबई) यांचा श्रृती नाद, चिपळूणच्या नृत्य मल्हार कथ्थक अकादमीतर्फे कला दर्पण या कार्यक्रमाद्वारे कथ्थक नृत्याचे मनोहारी सादरीकरण आणि प्रसिद्ध गायक-कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची गायन मैफल, ही या महोत्सवाची प्रमुख आकर्षणे आहेत.
भावे यांच्या व्हायोलिनवादनाने शुक्रवारी (१६ डिसेंबर) रात्री ९ वाजता या महोत्सवाचा शुभारंभ होणार असून त्यांना केदार लिंगायत (तबला), राजन किल्लेकर (की बोर्ड) आणि सुयोग कांबळे (ऑक्टोपॅड) साथसंगत करणार आहेत.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी (१७ डिसेंबर) कला दर्पण या कार्यक्रमाद्वारे स्कंधा चितळे, मृण्मयी ओक, श्रेया पातकर, आदिती आगवेकर आणि श्वेता काळे या नृत्यांगना कथ्थक नृत्याचे दर्शन घडवणार आहेत. प्रसिद्ध गायक-कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या गायन मैफिलीने या पहिल्या-वहिल्या संगीत महोत्सवाची रविवारी (१८ डिसेंबर) सांगता होणार आहे. या मैफिलीत सावनी दातारही सहभागी होणार असून हेरंब जोगळेकर (तबला), सुशील गद्रे, (ऑर्गन), मिलिंद लिंगायत (पखवाज) आणि प्रभंजन पाठक (व्हायोलिन) साथसंगत करणार आहेत.
तिन्ही दिवशी रात्री ९ वाजता कार्यक्रम सुरू होणार असून महोत्सवाला प्रवेश विनामूल्य आहे.
अधिक माहितीसाठी निबंध कानिटकर (९४२२३७६३२७), अवधूत जोशी (९४०३०३१५५८), तेजस संसारे (९८६०४०३९२०) किंवा किरण पाध्ये (९४२०५२५६५७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

