राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वर्चस्व

पहिले तिन्ही क्रमांक सिंधुदुर्गातील नाटकांना

मुंबई : एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी केंद्रातून पहिले तिन्ही क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटकांना मिळाले आहेत. निर्वासित नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. देवगड येथील यूथ फोरम नाट्य संस्थेने हे नाटक सादर केले होते. राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे.

मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर आणि रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत एकूण २५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मालवण शाखाने सादर केलेल्या बझर नाटकाला दुसरा, तर मालवण येथील स्वराध्या फाउंडेशनच्या श्याम तुझी आवस इली रे या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या प्राथामक फेरीचे केंद्रावरील अन्य निकाल असे –
दिग्दर्शन : प्रथम – स्वप्नील जाधव (नाटक-निर्वासित), द्वितीय – अभय कदम (नाटक-बझर).

प्रकाशयोजना : प्रथम – श्याम चव्हाण (नाटक-निर्वासित), द्वितीय – श्याम चव्हाण (नाटक-बझर). नेपथ्य : प्रथम – अभय वालावलकर (नाटक-बत्ताशी), द्वितीय – सचिन गावकर (नाटक-निर्वासित).

रंगभूषा : प्रथम – साबाजी पराडकर (नाटक-संकासुरा ते महावीरा), द्वितीय – आदिती दळवी (नाटक-बत्ताशी..१९४७).

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : प्रफुल्ल घाग (नाटक-निर्वासित), व शुभदा टिकम (नाटक-बझर).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे – प्राजक्ता वाड्ये (नाटक-भिंती), योगिता सावंत (नाटक-श्याम तुझी आवस इली रे), कीर्ती चव्हाण (नाटक-या व्याकुळ संध्यासमयी), भाग्यश्री पाणे (नाटक-ए..आपण चहा घ्यायचा का ?), सोमा मराठे (नाटक-ऋणानुबंध), योगेश जळवी (नाटक- मधुमाया), प्रसाद करंगुटकर (नाटक-खरं सांगायचं तर), प्रसाद खानोलकर (नाटक-पासर-पॉन), कृष्णकांत साळवी (नाटक- मावळतीचे इंद्रधनू), दीपक माणगावकर (नाटक- मड वॉक).

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सतीश शेंडे, श्रीमती मानसी राणे आणि ईश्वर जगताप यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

असे होते निर्वासित नाटक

कोकणातील चाकरमानी मुंबईत गेल्यानंतर १० बाय १० च्या खोलीत संसार कसा थाटतो, त्यानंतर त्याला काय काय संघर्ष करावा लागतो, त्याला कोणकोणत्या अडचणी येतात, याची सांगड उत्कृष्ट अभिनयातून घालत देवगड (सिंधुदुर्ग) येथील युथ फोरमने सादर केलेल्या निर्वासित या नाटकाने रसिकांची मने जिंकली. लेखन आणि दिग्दर्शन स्वप्नील जाधव यांचे होते.

कथा भावनिक तसेच दमदार अभिनय असल्यामुळे रसिकांच्या डोळ्यांत टचकन पाणी आणण्यात कलाकार यशस्वी झाले.

राजापूर तालु्क्यातील एका गावातील एक व्यक्ती मुंबईला जाते. मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून त्याला नोकरी लागते. महापालिकेकडून त्याला १० बाय १० चे कर्मचारी वसाहतीतील घर राहायला मिळते. तेथे त्याची पत्नी आणि दोन मुलांसह त्याचा संसार थाटला जातो. संसाराचा गाडा ओढताना त्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुले मोठी होतात. मुलगा नोकरी करतो, तर मुलगी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीच्या शोधात असते. वाढत असताना मुलांचे विचार वेगळे आणि वडिलांचे विचार वेगळे. ते जुळत नसल्याने अनेकवेळा वादाचे प्रसंग ओढवतात. मुलगा मयूरचे एका मुलीशी प्रेम जमते. त्याला डोंबिवलीला एक जागा घ्यायची असते. त्यासाठी त्यासाठी दोन लाख रुपयांची गरज असते. पण गावाकडच्या घराच्या वीजपुरवठ्यासाठी लाच म्हणून दोन लाख रुपये मोजणाऱ्या वडिलांकडून त्याला पैसे मिळत नाहीत. पण भावी सासऱ्याकडून त्याला दोन लाख रुपये मिळतात. पण त्या जागेबाबत मुलाची फसवणूक होते. परिणामी लग्न होणार नसल्याचे सांगायला सासरा वडिलांकडे येतो आणि दोन लाख रुपये दिल्याचेही सांगतो. वडील दोन लाखाचा चेक त्यांना परत करतात. नोकरीची मुदत संपल्याने वडील आणि आई गावाकडे जायची तयारी करतात. मुलांनी तेथेच राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. मुंबईत येणारे चाकरमानी एक प्रकारे निर्वासितच असतात, असा काहीसा बोध नाटकातून दिला जातो.

नाटकात मुंबईतील कामगार वसाहतीतील खोलीची सजावट चांगली करण्यात आली होती. ती अगदी मुंबईतील खोली वाटत होती. नेपथ्य उत्कृष्ट होते. रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, संगीत या बाबीही चांगल्या होत्या. या नाटकात कांबळे नावाच्या पात्राने रसिकांना थोडे हसवण्याचा प्रयत्न करत रंगत आणली. मयूर आणि दर्शना या दोन मुलांनी दमदार अभिनय केला. आई आणइ बाबांचाही अभिनय चांगला झाला.

निर्वासित नाटकातील एक दृश्य
निर्वासित नाटकातील एक दृश्य

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply